anekant.news@gmail.com

9960806673

राज्य बँकेने साखरेचे मुल्यांकन 300 रूपयांनी वाढविले

तीन वर्षांनंतर वाढ, कारखान्यांना मिळणार वाढीव भांडवल
कोल्हापूर ः राज्य बँकेने साखर कारखानदारांना दिलासा देताना साखरेचे मूल्यांकन प्रतिक्रिंटल 3100 रूपयांवरून 3400 रूपये केले आहे. बँकेच्या नव्या आदेशानुसार कारखान्यांना या वाढीव दराचा लाभ तातडीने मिळणार आहे. याचा फायदा कारखान्यांना हंगामात भांडवल उपलब्धतेसाठी होईल.
वाढीव मूल्यांकनामुळे कारखान्यांना बँकेकडून मिळणारी उचल 3060 रूपये प्रतिक्विंटल इतकी मिळेल. यापूर्वी मूल्यांकनाच्या 85 टक्के रक्कम उचल म्हणून मिळत होती. आता हीउचल 90 टक्के मिळेल. शेतकर्‍यांची एफआरपी वेळेत पाहोच व्हावी, या उद्देशाने मूल्यांकन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बँकेने 1 जानेवारी 2020 ला साखरेचे मूल्यांकन 3100 रूपये केले होते. यानंतर पुढील 3 वर्षे बँकेने याच मूल्यांकनावर साखर कारखान्यांना कर्जे दिली. सध्या साखरेच्या वाढलेल्या किमती आणि कारखान्यांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ गृहीत धरून बँकेने 28 डिसेंबर 2023 पासून मूल्यांकन वाढविले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून राज्यातील अनेक कारखाने शेतकर्‍यांची एफआरपी देण्यासाठी बँकेकडून कर्जे घेतात. या कर्जाच्या आधारे शेतकर्‍यांना रक्कम दिली जाते.
अतिरिक्त 100 रूपये टॅगिंग आकारणार - 2020 पर्यंत राज्य बँक दर तीन महिन्याला साखर दराचा आढावा घेऊन मूल्यांकन ठरवत होती. यामुळे साखरेचे दर घसरल्यास त्याचा फटका कारखान्यांना बसत होता. 2020 ला मात्र किमान मूल्याइतकी किंमत गृहीत धरून साखरेचे मूल्याकन 3100 रूपये केले. यानंतर साखरेच्या दरात चढअउतार होत राहिली. परंतु बँकेने कोणताच निर्णय घेतला नव्हता. काही कारखानदारानीही मूल्यांकन वाढविण्याबाबत बँकेला विनंती केली होती. अखेर तीन वर्षांनी बँकेने मूल्यांकन वाढविले. सध्याच्या स ुरू हंगामात अंदाजित गाळपापेक्षा कमी गाळप होणार असल्याचे गरजेनुसार प्रतिक्विंटल 100 रूपये अतिरिक्त टॅगिंग आकारण्यात येणार आहे.
बँकेने साखर मूल्यांकन वाढविल्याचा फायदा ऊस उत्पादकांबरोबर कारखान्यांनाही होईल. सध्य स्थितीचा आढावा घेऊन आम्ही मूल्यांकनात वाढ केली. साखर कारखान्यांना जादा रक्कम मिळेल. त्यामुळे एफआरपी प्रलंबित न राहता ती वेळेत मिळेल. कारखान्यांनी कर्जाची रक्कम प्राधान्याने एफआरपीसाठी वापरावी, अशा सूचना केल्या आहेत. - विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य बँक (अ‍ॅग्रोवन, 31.12.2023)