पाणी वाचते, तणावर नियंत्रण
सातारा ः उसाच्या तोडीनंतर जमिनीत पाचट कुजवण्याच्या प्रयोगाकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. पाचट कुजविण्यामुळे जमिनीचा कस वाढत असून, उसाचे उत्पादनही वाढत आहे. सद्यःस्थितीत ऊसतोड सुरू असून 80 टक्के शेतकरी पाचट कुट्टी करत असल्याचे दिसुन येत आहे. या पाचटीमुळे बाष्पीभवन टळत पाण्याची बचत होत असल्याने पाचट जाळू नका, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
पाचट न जाळल्यामुळे वातावरण स्वच्छ राहते. पर्यावरण संवर्धनासदेखील हातभार लागतो. या स्थितीत जमिनीत पालापाचोळा कुजवणे, गव्हाचे धसकट कुजविणे फायद्याचे ठरते. रासायनिक खतांचा मारा करण्याऐवजी गव्हाचे काड किंवा उसाचे पाचट जमिनीत कुजवणे हा चांगला पर्याय आहे.
मात्र, अनेक शेतकरी उसाची तोडणी झाल्यावर पाचट पेटवून देतात. ते जाळल्यामुळे जमिनीतील उपयुक्त घटक नष्ट होतात. वातावरणही प्रदूषित होते. ऊस पिकात पाचटाच्या आच्छादनामुळे उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. परिणामी पाण्याची बचत होते. पाचट आच्छादनामुळे तणाचेदेखील नियंत्रण होते. जमीन सुपितेसाठी उपयुक्त गांडुळ आणि इतर जीवतंतूचे संवर्धन होते. यामुळे जमीन सुपीक होऊन सेंद्रीय कर्बदेखील वाढते. दरम्यान, अनेक जण आडसाल ऊस अथवा सुरूची ऊस लागण गेल्यानंतर खोडवा ऊस ठेवणार असल्यास मशिनने पाचट कुट्टी करून घेतात. त्यानंतर मल्िंचग व इतर खतांचा वापर करून पाचट कुजविली जाते.
मिळणारे फायदे
* जमिनीचा पोत वाढत आहे.
* जमिनीत नैसर्गिक खताचा निचरा
* उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन टळते
* पाचट आच्छादनामुळे तणाचे नियंत्रण
* प्रदूषण रोखले जात आहे.
पाचट जाळू नये, यासाठी शेतकर्यांमध्ये प्रबोधन झाले पाहिजे. ऊसतोडणीनंतर पाचट कुट्टी करून ती कुजविल्यास कार्बन डायऑक्साईड तयार होत पिकाची काळोखी वाढत उत्पादनातही वाढ होते. तसेच जमिनीचा पोत सुधारत जिवाणूदेखील वाढतात. - अंकुश सोनावले, कृषी तज्ज्ञ (सकाळ, 05.01.2024)