तेल उत्पादक कंपन्यांचा निर्णय ः 71.86 रूपये प्रतिलिटर दर मिळणार
कोल्हापूर ः सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणर्या इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ केल्यानंतर आता तेल उत्पादक कंपन्यांनी मक्यापासून तयार होणार्या इथेनॉलला 5.79 रूपये प्रतिलिटर इतके प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. सध्या 66.07 रूपये दर आहे. या अनुदानामुळे मक्यापासून तयार होणार्या इथेनॉलला 71.86 रूपये प्रतिलिटर दर मिळेल.
शुक्रवार दि. 5 जानेवारी 24 पासून खरेदी करण्यात येणार्या इथेनॉलला ही किंमत लागू होईल. इथेनॉल वर्षाच्या उर्वरित कालावधीत या किमती विचारात घेतल्या जाणार आहेत. जीएसटी वगळून हे अनुदान दिले जाईल.
यंदा साखर उत्पादनात घट येईल या अंदाजामुळ केंद्र सरकारने उसाचा रस व सिरपपासून इथेनॉल तयार करण्याला मर्यादा घातली. यामुळे सरकारच्या 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमाला धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. हा धोका टाळण्याकरिता तेल उत्पादक कंपन्यांनी नुकताच सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणार्या इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पाठोपाठ मक्यापासून तयार होणर्या इथेनॉलची किंमत वाढवली आहे.
एक दोन वर्षांपासून साखर उद्योगाबरोबरच धान्य आधारित डिस्टलरीजची संख्याही वाढत आहे. सध्या धान्यापासून तयार होणार्या 292 कोटी लिटर इथेनॉलची मागणी आहे. शासनाने सहकार्य केल्यास 500 कोटल लिटरपर्यंत इथेनॉल तयार होऊ शकते, असा अंदाज ऑल इंडिया डिस्टीलरीज असोसिएशनचा आहे. देशात कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांत मक्याचे अधिक उत्पादन घेतले जाते. अनेक राज्यांमध्ये मक्यावर आधारित इथेनॉल प्रकल्प उभे राहत आहेत.
साखर उद्योगातून खरेदी किंमत वाढीची मागणी - तेल उत्पादक कंपन्यांच्या निर्णयानंतर आता साखर उद्योगानेही बी हेवी मोलॅसिस, उसाचा रस, सिरपपासून तयार होणार्या इथेनॉलची खरेदी किंमत वाढविण्याची मागणी केली आहे. केंद्राने बी हेवी मोलॅसिस, उसाचा रस, सिरपपासून मर्यादित प्रमाणात इथेनॉल तयार करण्यास परवानगी दिली आहे. या घटकांपासून तयार होणार्या इथेनॉलची दरवाढ केल्यास त्याचा काहीसा लाभ इथेनॉल प्रकल्पांना होऊ शकेल, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. (अॅग्रोवन, 06.01.2024)