संत तुकाराम कारखाना ः 20 लाख रोपांचे उद्दिष्ट, शेतकर्यांना नाममात्र दरात वाटप
शिरगाव ः उसाची रोग प्रतिकारकारक शक्ती वाढवून साखरेचे उत्पादन मिळावे, यासाठी संत तुकाराम साखर कारखान्याकडून एप्रिलअखेरपर्यंत उसाच्या पाडेगाव जातीची सुमारे 20 लाख रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत जवळपास 9 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. शेतकर्यांना अल्प किमतीत त्याची विक्र केली जात आहे.
संत तुकाराम साखर कारखान्याकडून दरवर्षी शेतकर्यांना ही चांगल्या दर्जाची रोपे अल्प किमतीत उपलब्ध करून दिली जातात. मागील वर्षी पाडेगाव 265, 86032, 15012 या जातीची रोपे होती. यंदा त्यात पाडेगाव 1813 या जातीचाही समावेश करण्यात आला आहे.
कारखान्याचे मुख शेतकी अधिकारी राजेंद्र वणवे म्हणाले, आम्ही तयार केलेल्या रोपांची दरवर्षी सुमारे 400 ते 500 एकरांवर लागवड होते. निरोगी ऊस कारखान्यावर गाळप करण्यासाठी उपलब्ध होतो. याशिवाय, शेतकर्यांनाही जास्त उत्पादन मिळते. यंदाच्या वर्षी 20 लाख इतक्या रोपांचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत जवळपास 9 लाख रोपे तयार केली आहेत आणि आणखी काम सुरू आहे.
आमच्याकडील उसाचे रोप घेऊन शेतकर्यांनी शेती केली, तर त्याला पेरणी पूर्व व नंतरच्या मशागतीचे सर्व मार्गदर्शन मिळते. याशिवाय उत्पादन वाढते. त्यामुळे शेतकरी चार पैसे जास्त कमावतो. - बापूसाहेब भेगडे, उपाध्यक्ष संत तुकाराम कारखाना
आम्ही शेतकर्याला दिलेले रोपे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्याने उसाला उतारा चांगला मिळतो शिवाय उत्पादनही चांगले मिळते. शेतकर्याला फवारणी, गवत काढणी अशा प्रकारच्या मशागतीवर जास्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागत नाही. - साहेबराव पठारे, कार्यकारी संचालक, संत तुकाराम साखर कारखाना
उसाच्या रोपाची वैशिष्ट्ये -
* पाडेगाव 265, 86032, 15012 बरोबरच 1813 ही नवीन जात
* रोप तयार करताना त्यावर सीड स्ट्रीटमेंट
* तज्ज्ञांच्या देखरेखेखाली रोप तयार, चांगली वाढ झाल्यावर शेेतकर्यांना वाटप
* रोपाची काळजी कशी घ्यावी? अंतर्गत मशागत कशी करावी? लागणीपूर्व आणि नंतर शेतकर्यांना तज्ज्ञांकडून माहिती
* लागवडीखालील शेताची तज्ज्ञांकडून पाहणी व मार्गदर्शन
पाडेगाव जातीच्या रोपांचे फायदे
* पिकाचे उत्पादन वाढते, पिकाची रोगप्रतिकारक शक्तीतही वृद्धी
* उसावर रोग पडत नाही, गवताची वाढही मर्यादित
* कमी खर्चात जास्त उत्पादन
* उत्तम दर्जाच्या आणि निरोगी उसाचे गाळप
* कमी वेळेत पिकाची काढणी
* साखर उतार्यात वाढ
* जादा मशागतीपासून सुटका
* कारखान्याला मिळतो दर्जेदार ऊस (सकाळ, 07.01.2024)