दिनांक 16.01.2024 रोजी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांना भेटून पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ. श्री प्रशांतराव परिचारक यांनी एन.सी.डी.सी. कडील साखरेच्या मूल्यांकन दरामध्ये वाढ करणेबाबत पत्राद्वारे विनंती केली. त्याचबरोबर एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक श्री. बंसल साहेब यांना भेटून साखर मालतारण कर्जावरील मूल्यांकन दर वाढवणेबाबत विनंती केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील साखर कारखाने एन.सी.डी.सी. कडून साखर मालतारण कर्ज उपलब्ध करून घेतात. त्यांना सध्या साखर मालतारण कर्जावरील उचलीचा प्रति क्विंटल दर रूपये 3100/- इतका असून त्यामधून 15 टक्के मार्जिन मनी रक्कम वजा जाता फक्त रू. 2635 प्रति क्विंटल इतकीच रक्कम कारखान्यांना उपलब्ध होत आहे. तथापि दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांकडून साखर मालतारण कर्जावरील उचलीचा दर प्रति क्विंटल रूपये 3400 ते 3500 पर्यंत आहे. तसेच साखरेचा बाजारभाव प्रति क्विंटल रूपये 3500 ते 3700 पर्यंत आहे. त्यामुळे एन.सी.डी.सी. कडून साखर मालतारण कर्जावरील मिळणारा उचलीचा दर कमी असल्यामुळे साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम, तोडणी वाहतूक खर्चासाठी रक्कम कमी उपलब्ध होत असलेचे पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ. श्री. प्रशांत परिचारक यांनी दिली. यावेळी साखर धंद्याचे जाणकार, साखर धंद्यास ऊर्जित अवस्था आणण्यासाठी सातत्याने धडपडणारे मा.ना. श्री. नितीन गडकरी यांना भेटून याबाबतचे कळकळीचे निवेदन दिले.
त्यास अनुसरून केंद्रीय मंत्री मा.ना. श्री. नितीन गडकरी यांनी एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक श्री. बंसल साहेब यांना फोनवरून सूचना दिल्या असून मा.आ. प्रशांत परिचारक यांनीही एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक श्री. बंसल साहेब यांना भेटून साखरेचा मूल्यांकन दर वाढवणेकरिता विनंती व पाठपुरावा केला असून येणार्या आठवड्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे श्री. बंसल साहेब यांनी सांगितले. साखर मूल्यांकन दर वाढवण्यासाठी प्रयत्न केलेने एन.सी.डी.सी. कडून साखर मालतारण कर्ज घेणार्या सर्वच साखर कारखान्यांचा निधी उपलब्धतेसाठी फायदा होणार आहे. याबाबत सर्वच सहकारी साखर कारखान्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. (प्रेसनोट, 17.01.20214)