ऐस्टाचा पहिला अंदाज ः महाराष्ट्राचा हंगाम मार्चअखेर चालणार
कोल्हापूर ः देशात चालू गळीत हंगामात 316 लाख टन साखरेचे उत्पादन होईल. गेल्या हंगामापेक्षा ते 4 टक्क्यांनी कमी असेल, असा पहिला अंदाज ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (ऐस्टा) वर्तविला आहे. महाराष्ट्रात 96 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता असून, राज्यातील गळीत हंगाम मार्चअखेरपर्यंत चालेल, असेही ऐस्टाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
गतवर्षी देशात 329 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामान यामुळे देशात यंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता साखर कारखान्यांच्या संघटनांनी तसेच सरकारनेही वर्तवली आहे. ऐस्टाच्या अहवालातही गतवर्षीपेक्षा 4 टक्के कती उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात इथेनॉलकडे वळविल्या जाणार्या सुमारे 20 लाख टन साखरेचा समावेश नाही.
चालू हंगामाच्या सुरूवातील देशात 57 लाख टन साखर शिल्लक होती. ती आणि 316 लिाख टन अशी 373 लाख टन साखर हंगामअखेर उपलब्ध होणार आहे. देशाची गरज 290 लाख टन साखरेची आहे. त्यामुळे हंगामअखेर 82 लाख टन साखर शिल्लक राहणार आहे.
महाराष्ट्रात गतवर्षी 107 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते 96 लाख टनावर येणार असले तरी बिगर हंगामी झालेल्या पावसाने उसाचा उतारा वाढत आहे. तसेच ऊसतोड मजुरांची संख्या कमी असल्याने गाळप हंगाम लांबून सुरू उसालाही पक्व होऊन गाळपास पाठविता येणार असल्याने हे उत्पादन यापेक्षा अधिक होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक 47 लाख टन साखर उत्पादन करून तिसर्या क्रमांकावर राहणार आहे.
हंगामाच्या प्रारंभी वर्तविलेल्या अंदाजात 15 ते 20 टक्के बदल होऊ शकतो. त्यामुळे चालू हंगामात झालेले साखर उत्पादन, शेतात उभ्या असलेल्या उसाचे क्षेत्र याचा आढावा घेऊन जानेवारी महिन्यात ऐस्टा आपला साखर उत्पादनाचा पहिला अंदाज वर्तविते. या अंदाजात 3 टक्के कमी जास्त असा फरक पडू शकतो. - प्रफुल्ल विठलानी, अध्यक्ष, ऐस्टा (लोकमत, 30.01.2024)