anekant.news@gmail.com

9960806673

जय जवानचा 14 वर्षांचा वनवास

कारखाना बंद असल्याने शेतकर्‍यांची अडचण, कामगारांची भटकंती
नळेगाव ः येथील जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना गेल्या 14 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मोठी अडचण होत आहे. कामगार वणवण भटकत आहेत. दरवर्षी कारखाना चालू होणार अशी चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात काही होत नाही. त्यामुळे जय जवान कारखान्याचा 14 वर्षांचा वनवास कधी संपणार असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.
नळेगाव, ता. चाकूर येथे 1984 साली माजी गृहमंत्री शिवाजीराव पाटील चाकूरकर यांच्या संकल्पनेतून जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला होता. 30 वर्ष कारखाना सुरळीतपणे सुरू होता. जवळपास 14 वर्षांपासून कारखाना तांत्रिक कारणामुळे बंद पडला. या कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कोट्यावधी रूपयांचे कर्ज आहे. कर्ज थकल्याने बँकेने कारखाना ताब्यात घेतला आहे. आजही कारखाना बँकेच्या ताब्यात आहे.
10 हजार शेतकरी सभासद, 298 गावे, 7 तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला, 12500 टन गाळप क्षमता असलेला जय जवान जय किसान साखर कारखाना जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. या कारखान्याला जवळपास 300 एकर जमी आहे. कारखान्यात 300 कामगार होते.
कारखाना बंद असल्यामुळे चाकूर, अहमदपूर, उदगीर, शिरून अनंतपाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मोठी अडचण होत आहे. सुरूवातीच्या काळात राज्यात नावाजलेल्या मोजक्या कारखानदारीत याचेही नाव होते. या कारखान्याचे कार्यक्षेत्र साखर उतार्‍यासाठी राज्यात प्रसिद्ध होते. परंतु नंतरच्या काळात नेतृत्वाअभावी या कारखान्याला राज्यातील इतर कारखान्याप्रमाणे वाटचाल करता आली नाही.
जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्यासाठी माजी पालकमंत्री अमित देशमुख यांनी गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी वाजत गाजत मशिनरी पूजन केले होते. परंतु न्यायालयीन प्रक्रि येत कारखाना चालविण्यासाठी त्यांना मिळाला नाही. त्यानंतर दसर्‍याच्या मुहूर्तावर शैलेश पाटील चाकूूरकर यांनी परत मशिनरी पूजन केले. मात्र अद्याप बँकेने कोणालाही कारखान्याचा ताबा दिला नाही. आजही कारखान्यावर बँकेचाच ताबा आहे. बँकेच्या परवानगीशिवाय मशिनरी पूजन का केले असा प्रश्‍न शेतकरी सभासदांना पडला आहे. आजही मुख्य गेटला बँकेचेच कुलूप आहे.
कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. कोण चालवणार आहे यापेक्षा कारखाना चालणे महत्त्वाचे आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर शेतकर्‍यांसोबत कामगारांचे हित होणार आहे. कारखाना सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला जवळपास 50 वेळा कामगारांच्या वतीने निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री सहकारमंत्री यांनी लक्ष देऊन कारखाना सुरू करावा. - चंद्रशेखर डोंगरे, अध्यक्ष, कामगार संघटना (सकाळ, 29.01.2024)