कमी पावसाचा परिणाम; उसाची वाढ खुंटली, वजनात घट
बेळगाव ः साखरेचा जिल्हा म्हणून बेळगाव जिल्ह्याचा नावलौकिक आहे. मात्र यंदा पावसाच्या अभावामुळे बेळगावसह उत्तर कर्नाटकातील विजापूर, बागलकोट जिल्ह्यांतील ऊस उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम साखर उत्पादनावर घटण्याची शक्यता आहे.
यंदा जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. यामुळे उत्तर कर्नाटकातील अनेक नद्यातील पाण्याची पातळी कमी झाली. याचा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. तर ऊस उत्पादन घेणार्या शेतकर्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांतून साखर उत्पादनासह इथेनॉल निर्मिती कमी होण्याची शक्यता आहे. देेशात कर्नाटक राज्य ऊस उत्पादनात तिसर्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर कर्नाटकात ऊस उत्पादन अधिक प्रमाणात घेण्यात येते.
बेळगावसह उत्तर कर्नाटकात ऊस लागवड अधिक प्रमणात केली जाते. बिलाची खात्री असल्यामुळे शेतकर्यांचा कल ऊस पीक घेण्याकडे वाढला आहे. मात्र, उत्तर कर्नाटकात खरीप पूर्व हंगामापासून आवश्यक पाऊस झाला नाह. त्यामुळे उसाची वाढ यंदा खुंटली आहे. तर जिल्ह्यातील बर्याच भागातील ऊस पीक पावसाअभावी वाळून गेले आहे. उसाच्या वजनात घट झाली आहे.
जिल्ह्यातून अनेक नद्यात पुरेसा पाणी साठा नसल्याने काठावरील ऊस उत्पादन घेणारे शेतकरीही चिंतेत आहेत. गोकाक, हुक्केरी, चिक्कोडी, अथणी, रामदुर्ग आदी तालुक्यातील ऊस उत्पादन शेतकर्यांना यंदा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पाण्याची सुविधा असणार्या शेतकर्यांवर पिके वाचवण्याची धडपड करण्याची वेळ आली आहे.
* साखर कारखाने आणि ऊस संशोधन केंद्राच्या सर्व्हेनुसार यंदा साखर उत्पादनात किमान 8 टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, सर्व्हेनुसार ऊस उत्पादन प्रदेशातील 15 टक्के ऊस पाण्याअभावी वाळला आहे. यंदा आवश्यक प्रमाणात पाऊस न झाल्याने नुकसानीचे प्रमाण 50 टक्क्यांहून अधिक असल्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे.
यावर्षी पाण्याच्या अभावामुळे उसाची वाढ खुंटली आहे. तर काही भागांत उसावर रोगराई झाली आहे. दरवर्षी ऑक्टोबरपासून मार्चपासून ऊस गाळप हंगाम असतो. मात्र, यंदा फेब्र्ुवारीपर्यंतच हंगाम होण्याची चिन्हे आहेत. - डॉ. आर.बी. खांडगावी, संचालक, एस. निजलिंगप्पा साखर संस्था (सकाळ, 04.02.2024)