जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची कोंडी फुटली
शिवनगर ः 6 ते 50 किलोमिटर दरम्यानच्या ऊस वाहतूकीला 25 रूपये प्रतिटन अनुदान देण्याचे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सोमवार दि. 12फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मान्य केले आहे. जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांची कोंडी यामुळे माळेगावने फोडली आहे. कारखाना वाहतूकदारांची संघटना श्री नीलकंठेश्वर ट्रॅक-टॅक्टर ऊस वाहतूकदार संघटनेने कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे दर वाढविण्याची मागणी केली होती.
संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे यांनी सांगितले की, गाळप हंगाम 2023-24 चा गळीत हंगाम दुष्काळी परिस्थितीचा असल्याने उसाची कमतरता होती, तरीही वाहतुकदारांनी शर्थीचे प्रयत्न करून माळेगाव कारखान्यास ऊस पुरवठा करण्यास प्राधान्य दिले. तथापि यामधून ऊस वाहतुकदारांना दोन पैसे मिळाले पाहिजेत व अन्य मागण्यांसदर्भात कारखाना प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यामध्ये श्री नीकंठेश्वर ट्रक-ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटना व कारखाना प्रशासन यांच्यामध्ये वेळोवेळी चर्चाही झाली. माळेगाव कारखाना प्रशासनाने ऊस वाहतुकदारांना अनुदान स्वरूपामध्ये 6 ते 50 किलोमीटरमधील प्रतिटनास 25 रूपये, 51 ते 100 किलोमीटरपर्यंत 10 रूपये अनुदान देण्याचे मान्य केले. बैलगाडी व ट्रॅक्टर गाडी यांना वाहतुकीचा स्लॅब हा 1 ते 8 किलोमीटरचा केला आहे. (पुढारी, 14.02.2024)