रांजणी-21 - उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्हयातील ऊस उत्पादक शेतक-यांना वरदान ठरलेल्या नॅचरल शुगर व युपीएल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दर्जेदार व शास्वत ऊस उत्पादनाच्या दृष्टीने कारखाना स्थळी शेतकरी परिसंवाद आयोजीत केला होता. नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे यांचे अध्यक्षते खाली बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी हा परिसंवाद संपन्न झाला.
सदर मेळावा प्रसंगी कृषिरत्न बी.बी.ठोंबरे म्हणाले की, नॅचरल शुगरचे कार्यक्षेत्रातील सभासदांना झेबा तंत्रज्ञानाचे पॅकवर रू.500/- अनुदान देणार असल्याचे सांगितले. सदरची युपीएल कंपीनीची उत्पादने नॅचरल बझारमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पाडेगांव येथील ऊस संशोधन केंद्रा मार्फत मागील 10 वर्षा पूर्वी प्रसारीत करण्यात आलेल्या 10001 या ऊस जातीचे संशोधक श्री.डॉ.सुरेश पवार कार्यक्रमास उपस्थित होते. 10001 या ऊस जातीचे जनक डॉ. सुरेश पवार, माजी संचालक, पाडेगांव ऊस संशोधन केंद्र यांनी कमीत कमी पाण्यावर ऊस खोडवा व्यवस्थापन झेबा तंत्रज्ञाने कसे करावे हे विस्त्रुतपणे सांगून शेतक-यांचे प्रबोधन केले. शेतक-यांनी आता शास्त्रज्ञ बनावयास पाहिजे. ऊस उत्पादक शेतक-यांनी आपल्या शेतावर केलेले प्रयोग हेच संशोधन आहे आणि त्याची योग्य मांडणी करून प्रसार करावा असे आवाहन डॉ.सुरेश पवार यांनी केले. त्यांनी 10001 ऊस जातीची यशोगाथा सांगून शेतक-यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरेही दिली.
खोडवा व्यवस्थापना संदर्भात सदर परिसंवादात शास्त्रज्ञ, व मान्यवरांनी ‘ऊसाची पाचट ही काळया आईचे खाद्य आहे त्याला जाळू नका’ अशी कळकळीची विनंती केली. शेतक-यांना पाचट कुजविण्या विषयी विस्त्रुत असे मार्गदर्शन करताना ‘खोडवा ऊसामध्ये झेबा तंत्रज्ञानाचा वापर करा आणि थोडक्या पाण्यामध्ये खोडवा ऊस जोपासा’ असे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तावीक कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडूरंग आवाड यांनी केले आणि प्रवर्तक डॉ.सर्जेराव साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, सभासद, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते. खोडवा ऊस जोपासना कार्यक्रमा नंतर सर्व उपस्थित ऊस उत्पादक शेतक-यांना दुपारचे जेवण ठेवण्यात आले होते.