वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक गेटमे ः अन्यथा कारवाईचा इशारा
सोलापूर ः जिल्ह्यात सद्यस्थितीत साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. दुसरीकडे अनेक साखर कारखान्यांवर शेतकर्यांच्या उसाचा काटामारी होत असल्याची तक्रारी आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांची खात्री होण्यासाठी वजन काटा धरकांनी शेतकर्यांनी मागणी केल्या प्रमाणे त्यांच्या उसाच्या वाहनाचे वजन करून द्यावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई करू, असा इशारा वैध मापन शास्त्राचे उपनिबंधक अ.ध. गेटमे यांनी दिला आहे.
शेतकर्यांच्या उसाचे वजन कारखान्यातील प्रमाणीत वाहन काट्यावर करण्यात येते. शेतकर्यास खासगी वाहनकाटे धारक उसाच्या गाडीचे कारखान्यात जाण्यापूर्वी त्यांच्या वजनकाट्यावर वजन करून देत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. खासगी वजनकाटे धारक आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये लागेबांधे असल्याचाही संशय वाढला आहे. तशा तक्रारी शेतकर्यांनी केल्या आहेत. त्यामुळे उसाच्या वजनाबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशा तक्रारी वैधमापन शास्त्र कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. तरी खासगी वजन काटा धारकांनी त्यांच्याकडे वजनाकरिता येणार्या उसाच्या वाहनाचे वजन करून द्यावे.
कोणत्याही कारणास्तव ऊस वाहनाचे वजन करणे टाळू नये, तशा तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक गेटमे यांनी केले आहे. (पुढारी, 22.02.2024)