कार्यक्षेत्रात अजूनही दीड लाख टन ऊस शिल्लक
बिद्री ः येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात 101 दिवसात 8 लाख 8 हजार मे.टन ऊस गाळप करून 10 लाख पोती साखर उत्पादित केली आहेत. अजूनही कार्यक्षेत्रात सुमारे दीड लाख टन ऊस शिल्लक असून यंदा कारखान्याच्या इतिहासातील विक्रमी उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळ व प्रशासनाने ठेवले आहे. विशेष म्हणजे कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 7500 मे.टन असताना प्रतिदिन 8 हजारपेक्षा जास्त ऊस गाळप करून कारखान्याने नवीन उच्चांक केला आहे.
बिद्री साखर कारखान्याने जिल्ह्यासह राज्यात उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा कायम राखल्याने या कारखान्याला ऊस पाठवण्याकडे सभासदाचा अधिक कल असतो. यामुळे सभासद आणि बिगर सभासद आपला ऊस बिद्री कारखान्याला पाठवतात. परिणामी गाळप क्षमतेवर ताण पडत असल्याने कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी गाळप क्षमता 4500 वरून 7500 पर्यंत वाढवली. गाळप क्षमतेपेक्षा अधिक ऊस गाळप करण्याची परंपरा अधिकारी व कर्मचारी वर्गाने यंदाही कायम राखली आहे.
संचालक मंडळाने वापरलेल्या अत्याधुनिक मशिनरमुळे अधिक क्षमतेने गाळप सुरू असून आजअखेर 8 लाखांहून अधिक ऊस गाळप केला आहे. उर्वरित दिवसात आणखी एक ते दीड लाख टन ऊस गाळप करण्याचा मानस आहे. उत्पादकांनी पिकवलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे. - के.पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री साखर कारखाना (महासत्ता, 04.04.2024)