रांजणी -दि.-7) सुरक्षिततेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 4 मार्च ते 11 मार्च राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह देशभर साजरा केला जातो. यानिमित्त नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्यावर सुरक्षिततेचे विविध कार्यक्रम पार पडले.
कारखाना परिसरामध्ये सुरक्षितेची जागृती व सुरक्षिततेची साधने वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कारखान्यामध्ये काम करताना विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी वैयक्तीक आरोग्य व सुरक्षितेच्या बाबतीत नेहमी जागरूक असले पाहिजे. कर्मचा-यांनी स्वतःच्या शरीराची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे. कारखान्याने कर्मचा-यांसाठी सुरक्षिततेची सर्व साधने उपलब्ध करून दिली आहेत. परंतु ती वापरण्याचे कामी कांही कर्मचारी दुर्लक्ष करतात, त्यामुळे अपघात होतात. अपघात झाल्यानंतर कर्मचा-यांना इजा होते. कांही प्रसंगी शरीराचा कांही अवयव किंवा प्राण ही गमवावा लागतो. कर्मचा-यावर स्वतःची व कुटूंबाची ही जबाबदारी असते. घरातील कर्ता अपघाताने जखमी झाला तर त्याचे कुटूंबाला उदरनिर्वाहाचे दुसरे साधन उरत नाहीत. कर्मचारी अपघातामुळे घरातील इतरांवर त्याचा विपरीत परिणाम होतो व कुटूंबावर हालअपेष्टा सोसण्याची वेळ येते. हे सर्व टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या साधनांचा जास्तीत जास्त वापर करावा, काम करतांना कोणती काळजी कर्मचा-यांनी घ्यावी. तसेच रस्त्यावरून प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी जागृती करण्यात आली.