छत्रपती संभाजीनगर ः संत एकनाथ सहकारी साखर कारखाना कामगारांचा थकीत भविष्यनिर्वाह निधी लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. संत एकनाथ कारखान्याच्या थकित भविष्यनिर्वाह निधी रकमेसंदर्भात दाखल असलेल्या न्यायालयीन प्रकरणात उच्च न्यायालयाने थकबाकीदार आस्थापनेस आदेशित रकमेच्या 75 टक्के रक्कम क्षेत्रीय भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात 30 दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाची माहिती अशी की, पैठण येथील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधी रकमेचा भरणा करण्यास कुचराई झाल्याने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अधिनियम 1952 च्या कलम 7अ अंतर्गत क्षेत्रीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त (दोन) रमेशकुमार यांच्यासमोर चौकशी सुरू झाली होती. या चौकशीत आस्थापना तसेच तक्रारदार सेवानिवृत्त कामगार कृती समितीला सुनावरणीसाठी वारंवार संधी देण्यात आली.
विभागातर्फे प्रवर्तन अधिकारी एस.एस. मोदानी यांनी बाजू मांडली. त्या अनुषंगाने जून 2015 ते जानेवारी 2022 च्या अवधीसाठी 12 डिसेंबर 2023 रोजी एकूण 1 कोटी 68 लाख 92 हजार 558 रूपये भरण्यास आदेशित करण्यात आले आहे. आस्थापनेने ही रक्कम भरण्याऐवजी या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयापुढे विभागातर्फे अधिवक्ता नितीन केशवराव चौधरी यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे ऐकून घेत थकबाकीदार आस्थापनेस आदेशित रकमेच्या 75 टक्के रक्कम क्षेत्रीय भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात 30 दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्दे दिले. (लोकमत, 16.03.2024)