anekant.news@gmail.com

9960806673

नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

मार्चअखेर 133 लाख क्विंटल साखरनिर्मिती, 127 लाख टन गाळप

सोमेश्‍वरनगर ः मार्चअखेर पुणे जिल्ह्याचा साखर हंगाम शेवटाकडे पोचला असून हंगाम घेणार्‍या 14 कारखान्यांपैकी 9 कारखान्यांची धुराडी थंडवली आहेत. मार्चअखेर जिल्ह्यात 127 लाख टन उसाचे गाळप झाले असून 133 लाख क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे. पुरेशी थंडी आणि एकरी उत्पादनात वाढ झाल्याने सहकारी कारखान्यांनी 11 टक्के इतका उत्कृष्ठ साखर उतारा प्राप्‍त केला आहे. खासगीचा उतारा 10 टक्क्यांच्या आतच आहे.

जिल्ह्यातील यशवंत कारखाना बंदच आहे तर घोडगंगा, अनुराज, राजगड हे यावर्षी सुरू होऊ शकले नाहीत. उरलेल्या 14 कारखान्यांनी 1 नोव्हेंबरला सुरू झालेला हंगाम बर्‍यापैकी उरकला आहे. जिल्ह्यातील दौंड शुगर, बारामती अ‍ॅग्रो, पराग अ‍ॅग्रो, व्यंकटेश कृपा, श्रीनाथ म्हस्कोबा या मोठ्या घास असलेल्या खासगी कारखान्यांनी पोटभर गाळप करून हंगाम संपविला.

खासगी भीमा पाटस आणि नीरा भीमा, कर्मयोगी, छत्रपती या कारखान्यांना ऊस संपल्याने गाळप बंद करावे लागले. संत तुकाराम दोन दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. भीमाशंकर, माळेगाव 10-15 दिवसांत तर सोमेश्‍वर आणि विघ्नहरकडे अजूनही ऊस उपलब्ध असल्याने 20 एप्रिलच्या आत बंद होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा नेहमीपेक्षा अर्ध्या टक्क्याने वाढून 10.48 टक्के झाला आहे.

* साखर उतार्‍यात नेहमीप्रमाणे सलग सातव्या वर्षी सोमेश्‍वरने 11.88 अव्वल स्थान पटकावले आहे. पाठोपाठ संत तुकाराम 11.54, विघ्नहन 11.53, भीमाशंकर 11.46 यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
गाळपात बारामती अ‍ॅग्रोने विक्रमी 21 लाख तर दौंड शुगरने 18 लाख टन गाळप केले आहे. ऊस टंचाई असतानाही सहकारी मध्ये सोमेश्‍वरने साडेतेरा लाख, माळेगावने पावणेतेरा लाख तर भीमाशंकरने साडेदहा लाख टनांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडून भरभक्कम गाळप केले आहे. (सकाळ, 02.04.2024)