निर्णय कधी होणार याबाबत मात्र अस्पष्टता
कोल्हापूर ः ऊस हंगामाच्या अंतिम टप्प्यात इथेनॉलसाठी साखर वळविण्यास केंद्र सरकार परवानगी देण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र स्तरावरून सकरात्मक हालचाली सुरू असल्या तरी हा निर्णय कधी होईल, याबाबत अस्पष्टता आहे. साधारणतः 8 लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्यासाठी परवानगी मिळू शकते. केंद्राने याबाबत सकारात्मकता दाखवली असली तरी अजूनही सध्याचे उत्पादन व भविष्यातील विचार करूनच ही परवानगी देण्यात येईल, असे केंद्रिय सूत्रांनी सांगितले.
देशात सुरूवातीचे दोन महिने वगळता जानेवारीपासून महाराष्ट व कर्नाटकमध्ये साखरेचे अतिरिक्त उत्पादन सुरू झाले. हंगामाच्या पूर्वी या दोन राज्यात साखर उत्पादन कमी होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सर्वच संस्थांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रानी ही सावध भूमिका घेताना इथेनॉलपासून साखर निर्मितीवर बंधने लावले होते. जसा हंगाम पुढे जाईल तशी साखर निर्मिती वाढत गेली. यामुळे साखरेचा अपेक्षित तुटवडा जाणवला नाही. पण सरकारने निर्बंध कायम ठेवल्याने नवे इथेनॉल प्रकल्प मात्र अडचणीत आले.
ही स्थिती पाहता साखर उद्योगातील सर्वच संस्थांनी सरकारला साखर उत्पादन वाढत असल्याची जाणीव करून दिली. गेल्या दोन महिन्यांपासून तर प्रत्येक पंधरवड्याला अनेक संस्था केंद्राला इथेनॉल निर्मितीसाठी साखरेला परवानगी द्या अशी नव्यानेे मागणी करीत आहेत. गेल्या पंधरवड्यातील आकडेही साखर उत्पादन वाढ दाखवणारे आहेत.
साखर उद्योगाच्या सातत्यापूर्ण वाढीमुळे केंद्र ही याबाबतीत सकारात्मक विचार करत असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. मात्र जोपर्यंत साखरेचे उत्पादन खरेच वाढत आहे का याची खात्री केंद्राला पटत नाही, तोपर्यंत केंद्र स्तरावरून कोणत्याही हालचाली होणार नाहीत, असेही सांगण्यात आले. (अॅग्रोवन, 10.04.2024)