अधिमंडळाच्या सभेत निर्णय ः ऊस उत्पादकांना फायदा होण्याची अपेक्षा
वसमत ः कुरूंदा येथील टोकाई साखर कारखाना परभणी जिल्ह्यातील तुळजाभवानी साखर कारखान्याला सहयोगी तत्त्वावर देण्यास विशेष अधिमंडळाच्या सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. टोकाई कारखान्याची विशेष अधिमंडळाची सभा कारखानास्थळी संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव जाधव, सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते.
कारखाना आर्थिक अडचणीत आहे. शासनाकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने कारखाना बंद राहू नये, यासाठी हा कारखाना सहयोगी तत्त्वावर चालवण्यास देण्याकरिताचा ठराव सभासदांसमोर मांडून बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कारखान्यातील कर्मचार्यांचे भविष्यनिर्वाह निधी तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांची एफआरपी रक्कम थकली होती. एफआरपीच्या रकमेवरून सभासदांनी अनेक वेळा कारखान्याच्या ठिकाणी आंदोलन केले होते.
त्यानंतर आता अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेत कारखान्याच्या संचालकांनी तसेच उपस्थित ऊस उत्पादक सभासदांनी हा कारखाना तुळजाभवानी साखर कारखान्याला सहयोगी तत्त्वावर देण्यास एकमताने निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात कारखान्याचाी आर्थिक परिस्थिती सुधारून कारखान्याची थकबाकी देखील संबंधितांना मिळणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हा निर्णय फायद्याचा आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे सभासद खोब्राराजी वारे यांनी व्यक्त केली.
टोकाई साखर कारखाना तुळजाभवानी कारखान्याला सहयोगी तत्त्वावर देण्यात आला आहे. मात्र, काही जण भाडेतत्त्वावर देण्यात आलाचा अफवा पसरवीत आहेत. ऊस उतपादक शेतकर्यांनी या अफवांना बळी पडू नये. सहयोगी तत्त्वावर याचा अर्थ टोकाई कारखाना व तुळजाभवानी कारखान मिळून हा कारखाना चालवणार आहेत. तुळजाभवानी कारखान्याकडे व्यवस्थापन सक्षम ऊसतोड वाहतूक यंत्रणा यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना फायदा होणार आहे. - अॅड. शिवाजीराव जाधव, अध्यक्ष टोकाई कारखाना (सकाळ, 24.06.2024)