मुदतीत कर्ज परतफेड नाही, गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रूपये अडकले
सांगली ः जमीन विक्री करून कर्ज फेडण्यास महांकाली साखर कारखाना अपयशी ठरला आहे. कारखान्याने अटी व शर्तीनुसार जिल्हा बँकेचे थकीत कर्ज मुदतीत परतफेड केले नाही. वारंवार स्मरणपत्र देऊनही कारखाना परतफेड करत नसल्याने अखेर बँकेने कारखान्याशी केलेला जमीन विक्रीचा करार एकतर्फी रद्द केला आहे. याबाबत कारखान्याला तसेच ऋण वसुली प्राधिकरणास कळवण्यात आले. दरम्यान बँकेने जमीन विक्रीचा करारच रद्द केल्याने सदर जमिनी अनामत रक्कम गुंतवलेल्या गुंतवणुकदारांचे कोट्यावधी रूपये अडकले आहेत.
महांकाली साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुमारे 140 कोटी रूपयांच्या थकबाकीसाठी लिलाव काढला होता. मात्र, लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने बँकेने स्वतः हा कारखान विकत घेतला. दरम्यान, कारखान्याने या विरोधात ऋण वसुली प्राधिकरण (पुणे) येथे अपील केले. तसेच कारखान्याची जमीन प्लॉट पाडून विक्री करत बँकेचे कर्ज फेडण्याचा प्रस्ताव दिला.
बँकेने हा प्रस्ताव पूर्वी नाकारला होता. मात्र, प्राधिकरणाने कारखान्याला जमीन विक्री करून कर्ज फेडण्याची संधी देण्याचा आदेश बँकेला दिले. त्यानुसार जिल्हा बँकेने कारखाना व डेव्हलपर यांच्याशी त्रिपक्षीय करार करत जमीन विक्रीला परवानगी दिली. या करारास तसेच त्यातील अटी व शर्तींना प्राधिकरणाची मंजुरी घेेण्यात आली. तसेच कारखान्यास ओटीएस योजनेचाही लाभ देत 140 कोटींचे कर्ज तब्बल 101 कोटींवर आणण्यात आले.
मात्र करारानुसार कारखाना मार्च 2024 पर्यंत जमीन विक्री करून कर्ज परत फेड करण्यात अपयशी ठरला. जिल्हा बँकेने वारंवार कारखान्याच्या करारानुसार कर्ज परतफेड करण्यास कळवले. मात्र, कारखान्याने याला प्रतिसाद दिला नाही. उलट जमीन विक्रीसाठी आणखीन मुदत मागितली. ती बँकेने फेटाळून लावली. प्राधिकरणातही कारखान्याने धाव घेत मुदतीची मागणी केली. मात्र तिथेही कारखान्याला दिलासा मिळाला नाही.
कर्ज परतफेडीसाठी बँकेने सर्वोपरी सहकार्य करूनही कारखाना कर्ज परतफेड करण्यात अपयशी ठरल्याने अखेर बँकेने कारखान्याशी केलेला जमीन विक्रीचा करार रद्द केला आहे. कारखाना जिल्हा बँकेच्या मालकीचा आहे. दरम्यान, कारखान्याकडील सुमारे 140 कोटी रूपयांचे कर्ज वसूल करण्याचे आव्हान बँकेसमोर आहे. (सकाळ, 04.07.2024)