श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा मिल रोलर पूजन व मशिनरी पूजनाचा कार्यक्रम रविवार, दि.०७/०७/२०२४ रोजी दुपारी ४:०० वा. कारखान्याचे कर्मचारी श्री.विजयसिंह काशिनाथ शेळके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रमिला विजयसिंह शेळके यांच्या शुभहस्ते विधिवत पूजेने पार पडला.
गत वर्षी राज्यामध्ये पाऊसमान कमी झाल्यामुळे कार्यक्षेत्रात ऊसाची लागणीमध्ये काही अंशी घट झालेली आहे. त्यामुळे येता ऊस गळीत हंगाम कमी कालावधी राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी चालू वर्षी कार्यक्षेत्रात पावसाळ्यामध्ये सुरुवातीपासूनच चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे येता हंगामात कमी कालावधीत जास्ती जास्त ऊस गळीत करणेचे कारखाना व्यवस्थापनाने नियोजन केलेले असून त्यानुसार ऊस तोड वाहतूक यंत्रणा उभारणीचे काम चालू आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा म्हणून कारखान्याने ऊस गळीत हंगाम २०२४-२५ हा ऑक्टोबर २०२४ पासून सुरु करणेच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. त्याचीच सुरुवात मिल रोलर पूजनाने झाली आहे. चालू वर्षी ऊस गळीत हंगाम २०२४-२५ साठी १०२०० हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीची नोंद झालेली आहे. जनावरांसाठी चार, बेणे व गुऱ्हाळासाठी ऊस विल्हेवाट होऊन कारखान्यास अंदाजे ७.०० लाख मे. टन ऊस उपलब्ध होणार आहे. ऊस गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये कारखाना पूर्ण क्षमतेने चालविनेसाठी कारखान्याने टायर बैलगाडी ४००, ट्रॅक्टर टायरगाडी ३५०, वाहन टोळ्या २२५, हार्वेस्टर ५ अशी ऊस तोडणी यंत्रणा उभारणीसाठी करार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप होणेस मदत होणार आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे एकरी १०० मे. टन हून अधिक ऊस उत्पादन मिळविण्यासाठी सर्व पातळीवर कारखान्याकडून प्रयत्न केले जात आहेत. पुढील ऊस गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीच्या नोंदी मोबाईल अँपव्दारे सुरु आहेत. यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याकडे वेळेवर ऊस नोंदी देणेचे आवाहन अध्यक्ष श्री. पांडुरंग आबाजी राऊत यांनी केले आहे.
या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष, मा. श्री.पांडुरंग आबाजी राऊत, कारखान्याचे संचालक, श्री. महेश करपे, श्री. अनिल बधे, श्री. माधव राऊत, श्री. किसन शिंदे, भगवान मेमाणे, श्री. लक्ष्मण कदम, श्री. चंद्रकांत कदम, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डी. एम. रासकर, जनरल मॅनेजर (टेक्निकल), श्री. आर. एन. यादव, (जनरल मॅनेजर-डी अँड बी), श्री. आर. एस. शेवाळे, केन मॅनेजर, श्री. एस.बी. टिळेकर, इन्चार्ज चिफ इंजिनिअर श्री. एन.ए. भुजबळ, एच. आर. मॅनेजर श्री. डी. व्ही. रणवरे मॅनेजर, कृशिनाथ ग्रीन एनर्जी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. एम. मते तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी, शेतकरी व कर्मचारी बांधव उपस्थित होते.