जुलैमधील पहिल्या सप्ताहअखेरची स्थिती
कोल्हापूर ः देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाची लागवड सुमारे सव्वा लाख हेक्टरनी वाढली आहे. 8 जुलैअखेर देशात 56.88 लाख हेक्टरवाढ लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत देशात 55.45 लाख टन उसाची लागवड झाली होती. यंदा चांगल्या मॉन्सूनचा अंदाज व्यक्त केल्याने व काही ठिकाणी वेळेत पाऊस सुरू झाल्याने शेतकरी उसाची लागवड करीत आहेत. केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या देशातील 3 आघाडीच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये गेल्या महिन्याच्या कालावधीत बर्यापैकी पाऊस झाला. गुजरात, तमिळनाडू, बिहार, पंजाब, हरियाना, उत्तराखंड आणि मध्यप्रदेश या महत्त्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये मॉन्सूनच्या चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकरी उसाची लागवड करत असल्याचे केंद्रीय कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा उसाचे क्षेत्र गतवर्षीच्या पुढे असून हवामान व मॉन्सूनची परिस्थिती अनुकूल राहिल्यास त्याचा सरासरी उतारा आणि साखरेचा सरासरी रिकव्हरी दर सुधारण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी उसाची लागवड जुलैच्या उत्तरार्धात फारशी वाढली नाही. देशात विविध राज्यांमध्ये विविध कालावधीत उसाची लागवड केली जाते. उसाची लागवड होताना पावसाचे प्रमाण पाहिले जाते.
विशेष करून महाराष्ट्रामध्ये पावसाळी हवामानात जुलै ते ऑगस्टमध्ये 75 टक्के ऊस लागवड केली जाते. कर्नाटकात गेल्या दोन महिन्यात मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने रखडलेल्या ऊस लागवडीला काहीशी गती आहे. महाराष्ट्रातही आगामी काळात पावसाची चांगली शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात पाऊस झाल्यास महाराष्ट्रात आडसाली लागवडीही वाढतील, असा अंदाज आहे.
देशात वर्षभर ऊस लागवडी सुरू असल्या तरी मॉन्सूनचे चार महिने हे वर्षाच्या ऊस लागवडीसाठी महत्त्वाचे ठरतात. पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाल्यास हिवाळी व उन्हाळी हंगामात भूगर्भातील जलस्त्रोत चांगला राहतो. विहिरी व कूपनलिकांना पाणी पुरेसे असल्यास जानेवारी ते मार्चपर्यंतही ऊस लागवडी वेगात सुरू होऊ शकतात. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी ऊस तुटल्यानंतर पुरेसे पाणी असल्यास लगेच दुसर्या हंगामातील लागवडी होतात. यामुळे येत्या पंधरवड्यात चांगला पाऊस झाल्यास त्याचा दूरगामी परिणाम पुढील दोन ते तीन महिन्यावर होऊ शकतो. यामुळे ऊस लागवडीत आणखी वाढ अपेक्षित असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. (अॅग्रोवन, 10.07.2024)