साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची माहिती
शेटफळगढे ः साखर आयुक्तांनी ऊस नोंदीसाठी आता सातबारा गट क्रमांक, आठ अ चा खाते नंबर बंधनकारक केले आहे. शेतकरी गट क्रमांक व 8 अ चा खाते नंबर देत नसल्याने एकाच उसाची नोंदीसाठी कारखान्यांकडे होते. त्याचा परिणाम हंगाम अंदाजावर होत आहे. त्यामुळे साखर आयुक्त खेमनार यांनी गट क्रमांक व 8 अ चा खाते नंबर देणे कारान्यांना बंधनकारक केले आहे.
राज्यात ऊस हे नगदी पीक असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यात सरासरी 12.21 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. राज्यातील ऊस गाळप हंगाम हा साधारणतः ऑक्टोबर महिन्यात सुरू होत असून एप्रिल, मेपर्यंत उसाचे गाळप केले जाते. तथापि शेतकरी त्यांच्या उसाची नोंद आजूबाजूच्या 4 ते 5 साखर कारखान्यांकडे करतात.
जो कारखाना ऊस वेळेत नेईल व उसाला चांगला भाव देईल, अशा साखर कारखान्यांकडे ऊस घालण्यास शेतकर्यांचा कल असतो. त्यामुळे साखर कारखान्यांकडे नोंद झालेल्या क्षेत्राची दुबार, तिबार नोंद होते. त्यामुळे प्रत्यक्षात असलेले ऊस क्षेत्र हे वाढीव दिसते. तसेच कृषी विभागाकडून गाळप हंगामात गाळपास उपलब्ध होणार्या ऊस क्षेत्राची माहिती ही नजर अंदाजे असते. त्यात अचूकता नसल्याने गाळप हंगामात ऊस क्षेत्र होणारे उसाचे गाळप व उत्पादित होणारे साखर याबाबतचे अंदाज चुकतात. त्यामुळे केंद्र शासनास साखर उद्योगाबाबत धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. परिणामी याचा साखर उद्योगव विपरीत परिणाम होतो.
तसेच गाळप हंगामात ऊस क्षेत्राचा अचूक अंदाज घेता यावा, यासाठी साखर आयुक्तालयामार्फत महा ऊस नोंदणी पोर्टल विकसीत केले आहेत. हे पोर्टलमध्ये येणार्या गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे नोंद झालेल्या शेतकर्यांची सातबारा गट क्रमांक निहाय व 8 अ खाते क्रमांक निहाय माहिती भरणे साखर कारखान्यांना बंधनकारक केले आहे.
यामुळे दुबार नोंदी शेतकरी निहाय ऊस नोंदी शोधता येणार आहे. जेणेकरून ऊस क्षेत्राची अचूक आकडेवारी आयुक्तालयास प्राप्त होईल. ऊस क्षेत्राची माहिती अचूक असावी, यासाठी केंद्र शासनाकडून देखील वेळोवेळी पाइपुरावा होत असल्याने सर्व साखर कारखान्यांना ही माहिती महाऊस नोंदणी पोर्टलवर 20 जुलैपर्यंत भरणा करावी असे कळविले आहे.
याद्या देण्याचे सहकार्य करावे - बहुतांश साखर कारखान्यांकडे सातबारा उतार्यावरील गट क्रमांक उपलब्ध असून 8 अ प्रमाणे असणारा खाते क्रमांक कारखान्याकडे उपलब्ध नाही. यासाठी गाव कामगार तलाठी यांनी गावनिहाय सातबारा व आठ अ च्या याद्या साखर कारखान्यांच्या शेती विभागाच्या कर्मचार्यांना उपलब्ध करून सहकार्य करण्याची विनंती साखर आयुक्त खेमनार यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. (सकाळ, 15.07.2024)