anekant.news@gmail.com

9960806673

साखरेचा हमीभाव वाढणार, हंगामापूर्वी साखर कारखानदारांना दिलासा शक्य

या वर्षीच्या साखर हंगामापूर्वीच साखरेच्या हमीभावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनीच तसे संकेत एका कार्यक्रमात दिल्याने कारखानदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दरम्यान, २०१९ मध्ये साखरेचा हमीभाव प्रती क्विंटल २९०० रुपयांवरून ३१०० रुपये करण्यात आला. तेव्हापासून साखरेच्या हमीभावात वाढ झालेली नाही. दुसरीकडे उसाच्या एफआरपीत मात्र दरवर्षी वाढ होत गेली. त्या तुलनेत साखरेच्या दरात वाढ न झाल्याने कारखानदारांना एफआरपी देण्याबरोबरच कर्जाचे हप्ते भरताना अडचणी येत आहेत. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या शनिवारी (ता. २७) झालेल्या बैठकीत चोप्रा यांनी साखरेच्या हमीभाव वाढीवर भाष्य केले.

ते म्हणाले, '२०१९ पासून साखरेचा हमीभाव प्रती क्विंटल ३१०० रुपयेच आहे. मात्र, दुसरीकडे उसाच्या एफआरपीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आम्ही साखरेचा हमीभाव वाढवण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.'गेल्या वर्षी देशभरात उसाचे क्षेत्र ५७ लाख हेक्टर होते, यावर्षी हे क्षेत्र ५८ लाख हेक्टर आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. वाढलेले क्षेत्र आणि साखर उत्पादन लक्षात घेता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी द्यायची झाल्यास साखरेच्या हमीभावात वाढ अपेक्षित आहे. साखरेचा हमीभाव किमान ४२०० रुपये प्रती क्विंटल करावा. अशी मागणीही याच बैठकीत उद्योजकांतर्फे करण्यात आली.

कृषी मंत्रालय विविध फिडकॉस्टमधून इथेनॉल उत्पादनासाठी पाण्याच्या आवश्यकतेचे मूल्यांकन करण्यासाठी संशोधन करत आहे. प्राथमिक निकषांनुसार उसातील इथेनॉलला मका आणि तांदळाच्या इथेनॉलपेक्षा कमी पाण्याची आवश्यकता असू शकते, अशी माहितीही चोप्रा यांनी या बैठकीत दिली.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात निर्णयाची शक्यताअन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या सचिवांनीच साखरेच्या हमीभाव वाढीचे संकेत दिल्याने आता साखर उद्योगाचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे लागले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.