सहकार अपर निबंधकपदी मिलिंद आकरे यांची बदली
पुणे ः शासनानेे राज्याचे साखर सहसंचालक (प्रशासन) मंगेेश तिटकारे यांची महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर (एमडी) बदली केली आहे. तर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांची सहकार आयुक्तालयात रिक्त असलेल्या अपर निबंधकपदी (तपासणी व निवडणूक) बदली करण्यात आली आहे. तसे आदेश सहकार विभागाचे अवर सचिव अनिल चौधरी यांनी जारी केले असून दोघांनीही नवीन पदभार स्वीकारला आहे.
सहकार विभागात 1993 मध्ये तिटकारे यांनी सहकार आयुक्तालयांतर्गत विविध पदांवर काम केले. सहकार आयुक्तालयात आस्थापना उपनिबंधक, पणन उपसंचालक, मुंबई शहर 1 चे जिल्हा उपनिबंधक या पदावर काम केलेले आहे. उसाची एफआरपी आणि उसाच्या एफआरपीवसुलीसाठी महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) माहितीपुस्तिका तसेच इक्षुदंड ते इथेनॉल या साखर उद्योगाची भरारी या महाग्रंथाचे ते सहलेखक आहेत. सहकार आयुक्तालयात मिलिंद आकरे यांनी 2005 साली कर्जमाफी योजनेत उपनिबंधक म्हणून काम केलेले आहे. राज्य कृषी पणन मंडळावर सरव्यवस्थापक, काही काळ कार्यकारी संचालक म्हणून साडेसात वर्षे काम केले आहे. त्यानंतर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामध्ये ते गेली साडेसात वर्षे काम करीत होते. हे महामंडळ ऊर्जितावस्थेत आणण्यात शासकीय धोरणांबरोबरच आकरे यांचेही मोठे योगदान आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात सहकार विकास महामंडळाची स्थापना झाली आहे. (पुढारी, 27.07.2024)