anekant.news@gmail.com

9960806673

ऊसतोडणी यंत्र अनुदान योजनेत नव्याने 800 लाभार्थ्यांची निवड

सात दिवसांत ऑनलाइनद्वारे कागदपत्रे अपलोड करणे क्रमप्राप्‍त

पुणे ः केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदानावरील ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्‍त सुमारे 11 हजार 34 अर्जांमधून 800 अर्जधारकांची निवड दुसर्‍यांदा झालेल्या संगणकीय सोडतीमध्ये नुकतीच करण्यात आली आहे. संबंधितांना एसएमएसद्वारे निवड कळविण्यात आली असून, त्यांनी 7 दिवसांत ऑनलाइनवर सर्व कागदपत्रे अपलोड करणे क्रमप्राप्‍त आहे. त्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून छाननी होऊन साखर आयुक्तांकडून ऊसतोडणी यंत्र अनुदान खरेदीस पूर्वसंमती दिली जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

आरकेव्हीवायअंतर्गत 2022-23 व 2023-24 या दोन वर्ष कालावधीत 900 ऊसतोडणी यंत्रखरेदीवर खरेदी किंमतीच्या 40 टक्के अथवा 35 लाख रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजनेंर्गत ऊसतोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पांतर्गत पहिल्या लॉटरीमध्ये साखर आयुक्तालयाने 373 अर्जदारांना ऊसतोडणी यंत्रखरेदीसाठी पूर्व संमती देण्यात आली होती. त्यापैकी 100 यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. त्या सोडतीमधील पहिल्या 5 यंत्रधारक लाभार्थ्याच्या बँक कर्ज खात्यात एकूण 1 कोटी 69 लाख 75 हजार 31 रूपये इतके अनुदान 28 जून रोजी जमा करण्यात आलेले आहे.

साखर आयुक्तालयास योजनेनुसार कृषी आयुक्तालयाने आरकेव्हीवायमधून अनुदानासाठी आता नव्याने 14 कोटी रूपये दिलेले आहेत. त्यानुसार राज्यातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून आलेल्या ऑनलाइन अर्जानुसार लाभार्थ्याची यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार येत्या आठवड्यात प्राप्‍त अनुदानातील रक्कम यादीनुसार वाटप करण्यात येईल. उर्वरित अनुदान रक्कम आल्यानंतर यादीतील पुढील लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

ऊसतोडणी यंत्र अनुदान योजनेत पहिली सोडत ही राज्यस्तरीय होती. दुसर्‍या सोडतीमध्ये जिल्हानिहाय करण्यात आल्याने सर्वत्र ऊसतोडणी यंत्रांची उपलब्धता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. तसेच ग्रुप फार्मर्ससाठी (शेतकरी उत्पादक कंपन्या, साखर कारखाने, शेती सहकारी संस्था) खरेदी होणार्‍या यंत्रांसाठी 10 टक्के वाटा राखून ठेवण्यात आला आहे. - डॉ. कुणाल खेमनार, साखर आयुक्त, पूणे (पुढारी, 28.07.2024)