फलटण | येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याच्या चालू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील सर्व कारखान्यांच्या तुलनेमध्ये जादा ऊस दर देणार असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
उपळवे येथील लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे संस्थापक तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, ताराराजे नाईक निंबाळकर यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला ऊस दर मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन येणाऱ्या गळीत हंगामापासून सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील सर्व कारखान्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक ऊस दर देणार असल्याची ग्वाही यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी दिली.
यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले की; सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील दुष्काळी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या साठी लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याची उभारणी करण्यात आलेली आहे. कारखाना स्थापनेपासून सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील सर्वाधिक दर हा साखर कारखान्याने दिला आहे. सर्वांच्या सहकार्याने देशामधील सर्वाधिक उत्पन्न घेणारा कारखाना करण्याचे उद्दिष्ट आपल्या सर्वांपुढे आहे.
यावेळी रोलर पूजन समारंभाला संचालक विनय ठाकूर, उषा घाडगे, संजय पवार, अमर जगताप, राजू रणवरे, शिवाजी पाटील, मनोज होलम, गणपती नराळे, प्रदीप मोहिते, नितीन कर्णे, सचिन सावंत, रोहित नागटिळे, दादा जगदाळे, विनय पुजारी, सचिन शेंडगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.