बारामती : हंगाम २०२३-२०२४ मध्ये माळेगाव सहकारी कारखान्याने १३ लाख २७ हजार ९०८.६५३ मे. टनाचे गाळप केले आहे. रिकव्हरी उतारा १२.०२३ मिळालेली असून एकूण १५,२०,००० क्विंटल साखर पोती उत्पादन झालेली आहे.
संचालक मंडळाने २०२३ - २०२४ हंगामामध्ये गाळप केलेल्या सभासदांच्या उसास रुपये ३६३६/- प्रति मे. टन दर जाहीर करण्यात आला आहे. गेटकेन गाळप केलेल्या उसास रुपये ३२० प्रति टनप्रमाणे अंतिम दर देण्यात येणार आहे.
याशिवाय व्हरायटी उसास अनुदान रुपये १०० व खोडवा अनुदान रुपये १५० प्र.मे. टन असे एकूण सभासदांना व्हरायटी ऊसधारकास रुपये ३७३६ प्रति टन खोडवा ऊसधारकास ३७८६ प्रति टन याप्रमाणे उसाला भाव मिळणार आहे.
हंगाम २०२३ २०२४ मधील कारखान्याची एफ.आर.पी. रुपये ३६९४.३१ त्यामधून ऊस तोडणी वाहतूक खर्च ८६३.६४ वजा जाता निव्वळ देय एफ.आर.पी. रुपये २८३०.६७ प्रति टन आलेली असून ऊस पुरवठादारांना पहिला हप्ता रुपये ३००० प्रति टन व सभासदांना खोडकी अनुदान रुपये २०० प्रति टन अदा केलेले आहेत.
आता जाहीर केलेल्या भावानुसार उर्वरित देय रकमेपैकी सभासदांना रुपये २५० प्रति टन व गेटकेनधारकांना रुपये १०० प्रति टनप्रमाणे दीपावलीपूर्वी अदा करणार आहे. उर्वरित पेमेंट रक्कम मकर संक्रांतीपूर्वी अदा केले जाईल.
सहकारी चळवळीच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याच्या हेतूने कारखान्याने साखर उद्योगाच्या व उपपदार्थ निर्मितीची यशस्वी वाटचाल केलेली आहे. यामध्ये कारखान्याचे संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे.
यंदाच्या हंगाम पूर्वतयारीसाठी कारखान्यामधील अंतर्गत कामे चालू असून हंगाम वेळेत सुरू करण्याचया दृष्टीने सर्व विभागप्रमुख प्रयत्नशील आहेत. सर्व कामांची वेळेत पूर्तता करण्याबाबत चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांनी सूचना केलेल्या आहेत.
या वर्षी पर्जन्यमान चांगले असून या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा मानस कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप यांनी व्यक्त केला. कारखान्याने जाहीर केलेला भाव हा राज्यांत उच्चांकी स्वरूपाचा आहे.व्यवस्थापन, सभासद व कर्मचारी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उच्चांकी ऊस दरामध्ये कारखान्याचे सभासद, व्यवस्थापन, कर्मचारी, अधिकारी यांचे मोठे योगदान आहे.