कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) कामगारांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून वेतनासाठी सुरू असलेल्या लढ्यामुळे आज गुरूवार (ता.२६) एकाचवेळी पाच महिन्यांचा पगार अदा करण्यात आला. पहिल्यांदा एकाच वेळी पाच महिन्यांचे वेतन मिळाल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हंगामपूर्व कारखान्यातील कामांना गती आली आहे.
कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर दहा वर्षांपूर्वी २०१३ मध्ये कामगारांचा १८ महिन्यांचा पगार थकला होता. नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर काही अंशी पगार अदा केले होते. दरम्यान, एकूण ३४ महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने कामगारांनी गतवर्षीची उत्पादित साखरच विक्रीसाठी सोडली नव्हती.थकीत वेतनासाठी कामगारांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले होते. आताच्या संचालक मंडळाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आगामी गळीत हंगाम, मशिनरी मेंटेनन्स, तोडणी वाहतुकदारांना अॅडव्हान्स देण्यास केडीसीतर्फे अर्थसहाय्य मिळण्यासाठी पाठपुरावा केला.
दरम्यान, कामगारांना पगाराचा विश्वास दिल्याने साखर विक्रीसाठी कामगारांची संमती मिळाली. हसन मुश्रीफ यांचेही भरीव सहकार्य मिळाल्याचे संचालकांनी सांगितले. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील, प्रकाश पताडे, विद्याधर गुरबे, अशोक मेंडुले, अधिकारी व्ही. एच. गुरव यांच्या उपस्थितीत कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात वेतन धनादेशाचे वितरण केले.