anekant.news@gmail.com

9960806673

कोटा घटविल्याने दसर्‍याला साखरेच्या दरात वाढ शक्य

ऑक्टोबरसाठी 25.5 लाख टनांचा साखर विक्री कोटा

कोल्हापूर ः केंद्रानेे ऑक्टोबर महिन्यासाठी देशातील कारखान्यांना स्थानिक विक्रीसाठी 25.5 लाख टनांचा साखर कोटा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साडेतीन लाख टनांचा विक्री कोटा कमी दिल्याने दसरा, दिवाळीच्या दरम्यान साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दसरा दिवाळीसाठीची खरेदी येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.
गेल्या वर्षी केंद्राने ऑक्टोबरसाठी दोन टप्प्यात कोटा दिला होता. पहिल्या टप्प्यात 28 तर दुसर्‍या टप्प्यात 1 लाख टन साखरेचा कोटा केंद्राने दिला होेता. सध्या साखरेला मागणी नाही. गेल्या वर्षीपेक्षा यंदा स्थानिक बाजारात साखरेला सरासरी 100 ते 200 रूपयांनी दर कमी आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान साखरेच्या दरात अल्प वाढ झाली.
मध्यंतरी एमएसपी वाढीबाबत सातत्याने चर्चा झाल्या. यामुळे बाजारात काही प्रमाणात तेेजी आली. सरकारने इथेनॉल वरील निर्बंध उठवले. इतर अनेक काही निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण महत्त्वाची असणारी साखरेचा किमान विक्री दर वाढविण्याची मागणी अद्याप मान्य केली नाही.सरकार सकारात्मक असले तरी नेमका निर्णय कधी याचा अंदाज केंद्राने अद्याप साखर उद्योगाला दिला नाही. या पार्श्‍वभूमीवर सध्या तरी साखर बाजार स्थिर आहे.
साखर कारखाने हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तथापि, सप्टेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र आणि देशभरात सतततेच्या पावसामुळे कारखान्यांच्या स्तरावर साखरेची मर्यादित विक्री झाली नाही. त्यामुळे साखर साठा वाढला आहे. परिणामी सरकारने ऑक्टोबर 2024 साठी मासिक साखर कोटा कमी करावा अशी मागणी साखर उद्योगाने अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे केली होती.
कोट्यात कपात केल्यानंतर मात्र येत्या 15 दिवसांत साखरेचे दर वाढतील अशी शक्यता आहे. मर्यादित कोटे असल्याने अतिरिक्त साखर बाहेर आल्याने दर समाधानकारक राहतील असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. दिवाळीमुळे स्थानिक बरोबर बाहेरील राज्यातूनही मागणी येण्याची शक्यता असल्याने पुढील हंगाम सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर जर साखरेला चांगला दर मिळाल्यास याचा फायदा येणार्‍या हंगामातील बिले वेळेत मिळण्यासाठी होऊ शकतो. (अ‍ॅग्रोवन, 30.09.2024)