वैजापूर-गंगापूरसह नेवासा, कन्नड तालुक्यातील शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी
वैजापूर ः वैजापूर गंगापूर, नेवासा व कन्नड तालुक्यातील शेतकर्यांसाठी एक गोड बातमी आली आहे. दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन झालेल्या पंचगंगा साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते किंवा त्यांची वेळ न मिळाल्यास महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते कारखान्याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आहे.
वैजापूर तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना हा अनेक वर्षांपासून बंद पडल्याने असंख्य ऊस उत्पादक शेतकर्यांवर संकट ओढावले होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना बाकी कारखान्यांपर्यंत ऊस घालण्यासाठी खूूप शर्तीचे प्रयत्न करावे लागले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी आमदार रमेश बोरनारे यांच्या पुढाकारातून व पंचगंगा समूहाने वैजापूर तालुक्यातील भगुर फाटा येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करत कारखाना उभारण्याचे काम सुरू केले होते.
अत्याधुनिक व नवीन टेक्नॉलॉजीचा हा कारखाना एवढ्या कमी कालावधीत सुरू होईल, याबाबत अनेक तर्क वितर्क लावले गेले. मात्र अखेर अल्प कालावधीत कारखान्याचे जवळपस सर्वच काम पूर्ण झाले. प्राथमिक चाचणी यशस्वी देखील झाली. या कारखान्यांच्या ऊस टोळ्या गावागावात दाखल झाल्या असून मुकादम कारखान्याच्या आदेशाची वाट पहात आहेत.
वैजापूर, गंगापूर, नेवासा व कन्नड तालुक्यातील शेतकर्यांच्या नोंदी यापूर्वीच कारखान्यात झाल्या. त्यामुळे कारखाना सुरू कधी होणार याकडे शेतकर्यांच्या नजरा होत्या. आता प्रत्यक्षात काही दिवसात हा कारखाना सुरू होणार असल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (पुढारी, 16.12.2024)