anekant.news@gmail.com

9960806673

माळेगाव कारखान्याच्याही निवडणुकीचा फड रंगणार

माळेगाव ः माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले आहे. येत्या २१ मेपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत, तर निवडणुकीचे मतदान २२ जून रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे छत्रपती पाठोपाठ आता माळेगावच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे.
माळेगाव साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मार्चमध्येच लागणार होती. मात्र अंतिम मतदार यादीबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीचा योग्य तो निर्णय होईपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे, असा आदेश सहकार विभागाने ९ मार्चला काढला होता.
दरम्यानच्या कालावधीत तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी तयार केलेल्या निवडणूक वेळापत्रक कार्यक्रमालाही शासनस्तरावर मंजुरी मिळाली नव्हती. परिणामी माळेगाव कारखान्याची निवडणूक आता दिवाळीपर्यंत पुढे जाते की काय, अशी कारखाना कार्यक्षेत्रात शंका उपस्थित होत होती.
दरम्यान उच्च न्यायालयातील तक्रारीही निकाली निघाल्या आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी वैभव नावडकर यांची माळेगवच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली व हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती केली. त्यामुळे पुन्हा निवडणूकीचे संकेत मिळाले होते. या पार्श्वभूमीवर दि १५ मे रोजी अशोक गाडे व यशवंत माने यांनी माळेगाव निवडणूक वेळापत्रक जाहीर केले.
निवडणुक कार्यक्रम
* उमेदवारी अर्ज दाखल करणे - २१ ते २७ मे
* उमेदवारी यादी प्रसिद्धी - २१ ते २७ मे
* अर्ज छाननी - २८ मे
* वैध उमेदवार यादी प्रसिद्धी - २९ मे
* उमेदवारी अर्ज माघार मुदत - २९ ते १२ जून
* अंतिम यादी व चिन्ह वाटप - १३ जून
* मतदान - २२ जून
* मतमोजणी - २४ जून (सकाळ, १६.०५.२०२५)