anekant.news@gmail.com

9960806673

इथेनॉल निर्मितीसाठी ऊस उत्पादक,साखर कारखान्यांपुढे मका पिकाचाही ठोस पर्याय

नवी दिल्ली ः उसाच्या रसापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या निर्मितीला केंद्र सरकारच्या धोरणाने मर्यादा आणल्यानंतर आता महाराष्ट्रातील ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांचा रोख मक्यापासून इथेनॉलनिर्मिती करण्याच्या पर्यायाकडे वळणार आहेत. केंद्र सरकारने मक्याच्या पिकाखालील क्षेत्र वाढविण्याला प्रोत्साहन दिल्यानंतर राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानेही ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कमी खर्चाचे मक्याचे पीक घेण्याचा सल्ला दिला आहे.
मक्यापासून इथेनॉलच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने मक्याच्या चांगल्या जातीच्या बियाणे विकसित करण्याचे निर्देश भारतीयकृषी संशोधन परिषदेला दिले आहेत. शेतकर्‍यांनाही बियाणे देऊन मक्याखालील पेरणीचे क्षेत्र वाढविण्याचे, तयार झालेला मका वाढीव दराने खरेदी करण्याचे आणि त्यातून तयार होणार्‍या इथेनॉलला आणखी चांगला दर देण्याचे धोरण केंद्राने जाहीर केले आहे. त्यामुळे मक्यापासून तयार होणार्‍या इथेनॉलला उसापासून तयार होणार्‍या इथेनॉलच्या बरोबरीचे भाव मिळण्याची शक्यता आहे.
उसाखालेचे क्षेत्र कमी करून त्या क्षेत्रात वर्षातून दोनवेळा मक्याचे पीक घेण्याच्या सूचना शिखर संघटना म्हणून आम्ही ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.
मक्याचे पीक फायदेशीर
* सध्या आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात मक्याचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मक्याच्या पिकाला फार पाण्याची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या असलेल्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मक्याचे पीक घेणे शक्य आहे.
* मक्याचे पीक साडेतीन ते चार महिन्यात कापणीसाठी उपलब्ध होत असल्यामुळे मक्याचे पीक खरीप आणि रब्बी मोसमात वर्षातून दोनवेळा घेता येते.
* मक्याच्या कणसापासून इथेनॉल तयार होते. तर पानांपासून जनावरांचा चाराही तयार होतो. त्यामुळे मक्याचे पीक घेणे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी फायद्याचा पर्याय ठरणार आहे. (लोकमत, 05.01.2024)