कर्हाड ः कृष्णा साखर कारखान्याचा वजनकाटा आपल्या अचूकतेमुळे नेहमीच धर्मकाटा म्हणून ओळखला जातो. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने कारखान्याच्या वजनकाट्याची अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी, प्रत्येकवेळी कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले.
उसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलावण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला. (लोकमत, 14.01.2024)