सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या एकत्रित बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या बैठकीत ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांच्या (कमिशनच्या) बाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
गत काही वर्षांमध्ये ऊस वाहतुकीविषयी जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांमध्ये एकसूत्रीपणा नव्हता. त्यामुळे वाहतूकदार आणि साखर कारखान्यांमध्ये आर्थिक कारणांमुळे सतत समस्या निर्माण होत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी आयोजित बैठकीत संपूर्ण जिल्ह्यासाठी ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांच्या (कमिशनच्या) एकाच निश्चित दरपत्रकास एकमुखी अनुमती देण्यात आली.
या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण १८ साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी आणि बैलगाडी, ट्रॅक्टर गाडी, ट्रक-ट्रॅक्टर, चारचाकी ट्रॉली वाहतूक, ऊस तोडणी यंत्र इत्यादींसह सर्व यंत्रणांचे जिल्ह्याकरता एकच ऊस तोडणी वाहतूक आणि ‘कमिशन’चे दरपत्रक सादर करण्यात आले. या दरपत्रकास सर्व साखर कारखान्यांनी एकमुखी अनुमती दिली. लवकरच सर्व साखर कारखान्यांनी आणि ऊस तोडणी वाहतूकदारांनी त्यावर कार्यवाही करण्याचे निश्चित केले आहे. ( हैलो महाराष्ट्र १८.०६. २०२४)