सुमारे 48 वर्षांनंतर इमारतीत होणार आमूलाग्र बदल
रेठरे बुद्रुक ः येथील य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याची जुनी इमारत आता लवकरच कात टाकणार आहे. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या पुढाकारातून 1976 साली जेव्हा कारखान्याचे विस्तारीकरण केले गेले, तेव्हा या इमारतीत सुधारणा करण्यात आल्या होतया. पण त्यानंतरच्या काळात मात्र किरकोळ बदल वगळता फारशा सुधारणा झाल्या नाहीत. आता मात्र कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी पुढाकार घेत, कारखान्याच्या विस्तारीकरणाबरोबरच या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल 48 वर्षांनंतर कृष्णा कारखान्याच्या या इमारतीला नवे आधुनिक रूप प्राप्त होणार आहे.
रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखाना हा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. 1955 साली या कारखान्याची स्थापना झाल्यानंतर कृष्णाकाठी हरितक्रांतीचे एक नवे पर्व साकारले गेले. सन 1976 साली कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेत, कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता 5 हजार मे.टनापर्यंत वाढविली. त्यावेळी कारखान्याच्या इमारतीत बदल करण्यात आले होते. त्यानंतर मात्र किरकोळ सुधारणा वगळता, इमारतीच्या रचनेत फारसे बदल झाले नाहीत. गेली 48 वर्षे याच इमातीत कारखान्याची मील, बॉयलिंग हाऊस, मील बॉयलर आदी विभाग कार्यरत आहेत.
दरम्यान कृष्णा कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता 12 हजार मे.टन करत, इमारतीचेही नुतनीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढविल्यामुळे शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत तुटण्यास मदत होणार आहे. तसेच नुतणीकरणामुळे कारखान्याची जुनी इमारत तब्बल 48 वर्षांनंतर कात टाकत नवे रूप घेऊन उभी राहणार आहे.
या नुतणीकरणाच्या प्रक्रियेत कारखान्याच्या इमारती भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती उपलब्ध राहील याचा विचार करून अनेक सुधारणा केल्या जात आहेत. इमारतीच्या छतावरील जुने सिमेंटच्या पत्र्यांच्या ठिकाणी अधिक टिकाऊ असे आकर्षक रंगसंगतीचे प्री कोटेड पॉलिकार्बोनेट पत्रे बसविले जात आहेत.
इमारतीच्या सभोवती असणार्या उभ्या भिंतीमधून हवा खेळती राहावी, यासाठी भिंंतीच्या वरील भागात आरआरसी जाळी बसविण्यात येणार आहे तसेच आवश्यक सामानाची ने-आण करण्यासाठी दरवाजांना रोलिंग शटर बसविले जाणार आहे. कारखान्याचा यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने कारखाना कार्यस्थळावर सध्या युद्धपातळीवर इमारतीच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या हंगामात रूपडे बदललेल्या नव्या इमारतीत आणि नव्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कारखाना कार्यान्वित होणार असल्याने, त्याचा लाभ शेतकरी सभासद व कर्मचार्यांना होणार आहे.
कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या इमारतीला नवे रूप दिले जात आहे. कारखाना इमारतीच्या नुतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येणार्या हंगामापूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. - महावीर घोडके, कार्यकारी संचालक, कृष्णा कारखाना (पुढारी, 09.07.2024)