कोल्हापूर विभागातील 3 साखर कारखान्यांकडून कामकाज सुरू
कोल्हापूर ः 2025 वर्षाअखेर 25 हजार मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासंदर्भात साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी कारखान्यांना सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानुसार सांगली जिल्ह्यातील 3 कारखान्यांनी सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू केले आहे.
एक मेगावॅटचा प्रकल्प उभारणीसाठी कारखान्याला साडेतीन एकर जागा लागणार आहे. त्यासाठी सुमारे 4 कोटी रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यातून 16 लाख युनिट वीज तयार होऊ शकते. प्रकल्पात जी वीज निर्माण होईल ती सहवीजप्रमाणे महावितरण कंपनीला विक्री करता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य ऊर्जा नियामक आयोगाने मान्यता दिली आहे.
सौरऊर्जा ही विनामूल्य आहे. यासाठी इतर कोणताही इंधन खर्च नाही. कोणताही कच्चामाल लागत नाही निर्मिती करताना कोणताही आवाज होत नाही. देखभाल व दुरूस्तीचा खर्च नगण्य असणार आहे. सौरऊर्जानिर्मिती केल्याने इतर ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होऊ शकते. प्रकल्प अल्पकाळात उभारणी केला जाऊ शकतो. परंतु या प्रकल्पाचे आय ुष्य 25 वर्षे आहे.
कारखान्यातील ऊर्जा त्याच भागात वापरता येईल. तरूणांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. कार्बन फूट प्रिंट कमी होण्यास पर्यायाने ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत होईल. हायड्रोजन इकॉनॉमीमध्ये ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी सौरऊर्जेचा वापर वर्षभर करणे शक्य होईल.
विभागातील सांगली जिल्ह्यातील राजारामबापू, सोनहिरा कारखान्यास अन्य एका कारखान्याने प्रकल्प उभारणी कामकाज सुरू केले आहे. अन्य कारखान्यांकडून सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या हालचाली सुरू आहेत. - गोपाळ मावळे, साखर सहसंचालक, कोल्हापूर
जागतिक मानकांनुसार - पॅरिस करारानुसार आंतरराष्ट्रीय निश्चित मानकांनुसार 40 टक्के ऊर्जा 2030 पर्यंत अजीवाश्म इंधन स्त्रोतापासून निर्माण करावयास भारत सरकारने कटिबद्धता दर्शविली आहे. केंद्र शासनाने नवीन व नवीकरणीय (अपारंपरिक) ऊर्जा स्त्रोतांचे महत्त्व विचारात घेऊन ही योजना सुरू केली आहे. (पुढारी, 219.07.2024)