नांदेड विभागात गतवर्षीच्या तुलनेत उसाचे लागवड क्षेत्र घटले, तरी सध्याच्या पुरेशा पावसाने उसाच्या वजनात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नांदेड विभागातून ९०.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. यंदा क्षेत्र घटले, तरी उत्पादनावर फारसा परिणाम होणार नसल्याचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
नांदेड विभागात नांदेडसह हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्यातील २९ ते ३१ साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करतात. या चार जिल्ह्यांत मागील वर्षी (२०२३-२४) ऊस लागवडीचे क्षेत्र एक लाख ६६ हजार ८५५ हेक्टर इतके होते. तर यंदा एक लाख २५ हजार ४८५ हेक्टर आहे. यात ४१ हजार ३७० हेक्टरने घट झाली आहे.
तसेच मागील वर्षी (जून २०२३) मराठवाड्यात नांदेड जिल्हा सोडला, तर, इतर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वच पिकांना फटका बसला होता. विशेषतः पाणी कमी झाल्याने उसाचे वजन घटले होते. त्यामुळे सरासरी १० ते १५ टक्के उत्पादन घटणार अशी शक्यता प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून वर्तविण्यात आली होती.
परंतु मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस व कारखान्यांनी उसाचा रस इथेनॉलकडे न वळविल्याने साखरेचे उत्पादन वाढले होते. याशिवाय विभागातील काही कारखान्यांनी गाळपाची क्षमता वाढवून घेतली होती. त्यामुळे क्षेत्र घटल्याचा फारसा परिणाम झाला नाही. नांदेड जिल्ह्यातील ऊस हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी गाळपासाठी जातो. या वर्षी (२०२४-२५) साधारणत: २.५० लाख मेट्रिक टन ऊस हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखाने गाळप करतील.
तसेच लातूरमधील कारखाने धाराशिव व बीड इतर जिल्ह्यातील २.८० लाख मेट्रिक गाळप करतील. तसेच परभणी जिल्ह्यातील कारखाने बीड व जालना जिल्ह्यांतील पाच लाख मेट्रिक ऊस गाळप करतील. त्यामुळे विभागातील एकूण गाळप ९०.२८ लाख मेट्रिक टन इतके होईल, असे साखर विभागाकडून सांगण्यात येत आहे.
यावर्षी साखर उत्पादनावर थोडासा परिणाम होईल. विशेषतः विभागातील लातूर, परभणीत घट होईल. नांदेड, हिंगोलीला उत्पादन चांगले राहील. तसेच सध्या मराठवाड्यातील सर्वच धरणात पाणीसाठा चांगला झाला आहे. जमिनीतील पाणीपातळीही वाढली आहे, त्यामुळे २०२५-२०२६ मधील हंगाम चांगला राहणार आहे.
- सचिन रावल, प्रादेशिक सहसंचालक, (साखर) नांदेड.