anekant.news@gmail.com

9960806673

शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि प्रशासनाची बैठक निष्फळ, बैठकीकडे कारखानदारांचा कानाडोळा

साखर कारखानदार ऊस दराबाबत गांभिर्याने दखल घेत नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना कारखानदारांची मस्ती उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. ऊसदराच्या बैठकीला साखर कारखान्याच्या कामगारांना पाठवणाऱ्यांचा कारखानदारांना हा आमचा शेवटचा इशारा असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हणाले. सोमवारी (ता.०९) जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार, प्रशासन आणि शेतकरी संघटना यांची बैठक बोलवण्यात आली परंतु या बैठकी कोणताही तोडगा न निघाल्याने सर्वच शेतकरी संघटनांनी आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत साखर कारखानदारांच्या चेअरमन आणि संचालकांना थेट इशारा दिला.

गळीत हंगाम २०२३ -२४ मधील ऊस दरातील फरक व चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन ३ हजार ७०० रुपये मिळावी या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या रेट्यामुळे साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांची बैठक सोमवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालकच आलेच नसल्याने शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत बैठकीमध्ये प्रशासन आणि कारखानदार यांच्या निषेध केला.

अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले की, "विवीध शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आजची बैठक स्थगित करत आहोत. पुढच्या दोन दिवसात साखर कारखान्यांच्या चेअरमन आणि संचालकांना पुन्हा नोटीस काढण्यात येईल यानंतर पुढच्या बैठकीबाबत सर्वांना कळवण्यात येईल" अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली. यावेळी शेतकरी संघटनांनी याचा निषेध करत पोरखेळ चालवला असल्याचे सांगत कारखानदारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, "जिल्ह्यात मागचे काही दिवस आंदोलन सुरू आहे. साखर कारखाने सुरू करण्याची शेतकरी संघटनांनी परवाणगी दिली परंतु साखर कारखानदार दर ठरवत नसतील तर सुरू असलेले साखर कारखाने बंद करण्याची आमच्या हिम्मत आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून दराबाबत आंदोलन सुरू असुनही कारखानदार बैठकीला येत नसतील तर त्यांची मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही" असा इशारा शेट्टी यांनी दिला.

शेट्टी म्हणाले "उसाचा दर ठरवणे ही काय पोराटकी नाही, या बैठकीला उसाचा दर ठरवण्याचा अधिकार नाही त्या कामगारांना पाठवून देत असतील तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना मिळून कारखानदारांचा माज उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. तसेच इतर जिल्ह्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची रिकव्हरी जास्त बसूनही हे कारखानदार दर ठरवत नाहीत याचा अर्थ कारखानदार चोर आहेत" असेही शेट्टी म्हणाले.

आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे म्हणाले की, "मागच्या दोन महिन्यांपासून शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ऊस दराबाबत आंदोलन सुरू आहे. १५ दिवस अन्नत्याग आंदोलन केले परंतु कारखानदारांनी यावर बैठक बोलवून तोडगा काढू असा निर्णय दिला. याबाबत पुढे कसलीही कारखानदारांवर कारवाई प्रशासनाकडून का करण्यात आली नाही. असा थेट सवाल अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना चुडमुंगे यांनी केला".याचबरोबर किसान सभा, जयशिवराय संघटना, भारतीय किसान मोर्चा या शेतकरी संघटनांनी आपले म्हणणे मांडले.