(लेखक - शिवाजीराव देशमुख, सुधा घोडके, डॉ. क्रांती निगडे)
बदलत्या हवामानामुळे हुमणी किडीचे प्रौढ जमिनीतूनन यावर्षी लवकर बाहेर आले आहेत. तुलनेत यंदा किडीचा प्रादूर्भात लवकर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हुमणीचा बदलता जीवनक्रम लक्षात घेवून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दरवर्षी वळीव पावसानंतर हुमणीचे भुंगेरे यावर्षी मार्चमध्येच आढळून आले आहेत. त्यामुळे यंदा हुमणीचा प्रादुर्भाव लवकर व मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे हुमणी किडीची जीवनशैली देखील बदललेली आहे. यापूर्वी वळवाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीची भुंगेरे जमिनीतून बाहेर येण्यास सुरूवात व्हायची. मात्र यावर्षी मार्च महिन्यामध्येच भुंगेरे बाहेर येत असल्यामुळे नर व मादीचे मिलन लवकर होवून पुढील काळात हुमणीचा प्रादुर्भाव अधिक वाढेल. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उगवणीत ४० टक्क्यांपर्यत नुकसान होते. तर ऊस उत्पादनात हेक्टरी १५ ते २० टनांपर्यंत नुकसान होते. त्यामुळे हुमणी किडीचा बंदोबस्त योग्य वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जीवनक्रम - किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थेत पूर्ण होतो. मॉन्सूनच्या पहिल्या सरीनंतर हुमणीचे प्रौढ भुंगेरे संध्याकाळी जमिनीच्या बाहेर येतात. त्यानंतर कडूलिंब, बाभूळ, बोर इत्यादी झाडांची पाने खातात. या झाडांवर नर आणि मादिचे मिलन होते. त्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते.
* अळीची पहिली अवस्था २५ ते ३० दिवस, दुसरी ३० ते ४५ दिवस व तिसरी अवस्था १४० ते १४५ दिवसांची असते. तिसर्या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत खोल गेल्यानंतर कोषावस्थेत जाते.
* किडीची एक पिढी पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.
नुकसानीचा प्रकार
* प्रथम अवस्थेतील अळी जमिनीतील कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर किंवा पिकाच्या मुळावर उपजीविका करते. दुसर्या व तिसर्या अवस्थेतील अळी ऊस व इतर पिकांची मुळे खातात. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त ऊस निस्तेज दिसतो. पाने मरगळतात, हळुहळू पाने पिवळी पडतात. साधारणपणे २० दिवसांमध्ये संपूर्ण ऊस वाळून काठीसारखा दिसतो.
* एका उसाच्या बेटाखाली सुमारे २० अळ्या आढळून येतात. उसाचे एक बेट एक अळी तीन महिन्यात तर दोन किंवा त्यापेक्षा जास्त अळ्या एका महिन्यात कुरतडून कोरडे करतात.
* अळी जमिनीखाली उसाच्या कांड्यांवर देखील उपद्रव करते. प्रादूर्भावग्रस्त उसाला हलका झटका दिल्यास ऊस सहजणे उपटून येतो.
* हेक्टरी २० ते २५ हजारापर्यंत अळ्या सापडल्यास साधारणपणे हेक्टरी १५ ते २० टनांपर्यंत नुकसान होते. जास्त प्रादुर्भावामध्ये पिकाचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
* हुमणीचा बारा महिन्यात एकच पिढी तयार होत असली तरी अळीचा जास्त दिवसाचा कालावधी आणि मुळावर उपजीविका करण्याची क्षमता यामुळे मोठे नुकसान होते.
एकात्मिक कीड नियंत्रण
अ) पारंपारिक पद्धती -
* प्रौढ भुंगेरे गोळा करून नष्ट करणे.
* रात्रीच्या वेळी भुंगेरे जमिनीतून बाहेर येवून बाभूळ व कडूनिबांच्या झाडावर जमा होतात. संध्याकाळी ७ ते ९ या दरम्यान झाडाच्या फांद्या हलवून जमिनीवर पडलेेले भुंगेरे गोळा करून ई.पी.एन. ५० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात तयार केल्यास जैवीक कीड नियंत्रकाच्या द्रावणात टाकून मारावेत.
* भुंगेरे जमा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
रासायनिक पद्धती -
* कडूनिंब किंवा बाभळीच्या झाडावर इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एस.एल.) ०.३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
* शेतामध्ये शेणखत, कंपोष्ट खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेणखत किंवा कंपोष्ट खतातून हुूमणीची अंडी व अळ्या शेतामध्ये जातात. त्यासाठी एक गाडी शेणखतामध्ये दाणेदार फिप्रोनील (०.३ जी.आर.) १ किलो मिसळून नंतर शेतात टाकावे.
* मोठ्या उसामध्ये फिप्रोलीन (४० टक्के) व इमिडाक्लोप्रिड (४० टक्के डब्लूजी) ५०० ग्रॅम प्रति हेक्टरी १००० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून जमिनीत द्यावे.
जैविक पद्धत - जैविक पद्धतीमध्ये किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा वापर केला जाताो. हुमणीचे नैसर्गिक शत्रु जसे बुरशी, सूत्रकृमी यांचा वापर किडींचा नायनाट करण्यासाठी केला जातो. यात बिव्हेरिया बॅॅसियाना मेटारायझीयम अॅनिसोपली या बुरशीचा वापर नियंत्रणासाठी केला जातो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट या संस्थेद्वारे जैविक कीड नियंत्रक विकसीत करण्यात आले आहे.
ईपीएन (एन्टोमोपॅथोजनिक नेमॅटोड) - यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटद्वारे विकसित केलेल्या सूत्रकृमीयुक्त द्रवरूप ईपीएनचा वापर करण्यात आला आहे. हे जमिनीमध्ये आढळणारे परोपजीवी सूत्रकृमी असून ते जमिनीमधील हुमणीला शोधून तिच्या शरीरावरील छिद्रांवाटे किंवा तोंडावाटे प्रवेश करतात. त्यानंतर ते किडीचा रोगग्रस्त करून तिच्या शरीरात वाढतात. मृत किडीच्या शरीरातून बाहेर पडून जमिनीमधील दुसर्या हुमणीला रोगग्रस्त करतात. त्यामुळे हुमणी अळीचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होते.
वापर (प्रति एकर) -
* ई.पी.एन. १ लिटर प्रति ४०० लिटर पाणी या प्रमाणात मुळांजवळ वाफसा स्थितीत आळवणी करावी.
* ई.पी.एन. हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू असल्याने जमिनीतील उपयुक्त जिवाणू तसेच पिकांवर विपरीत परिणाम होत नाही.
(कृषी सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी, जिल्हा पुणे)