विश्वासचे कार्यकारी संचालक अमोल पाटील ः साखरेचेही दर वाढवावेत
शिराळा ः उसाच्या रास्त भाववाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या किमान विक्री किमतीत आणि इथेनॉलच्या किमतीमध्ये समतूल्य तातडीने वाढ होणे आवश्यक आहे, अशी माहिती विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी जाहीर केलेल्या निर्णयात, आगामी गळीत हंगामासाठी एफआरपी प्रतिक्विंटल ३४० वरून ३५५ रूपये केली आहे. या निर्णयामुुळे उसाला चांगला दर मिळणार आहे. २०१९ मध्ये प्रतिक्विंटल २७५ रूपये एफआरपी होती. त्यानंतर सहा वेळा त्यात वाढ करण्यात आली आहे. त्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जो २०१९ पासून प्रतिक्विंटल ३१०० रूपयांवर स्थिर आहे. या असमतोलमुळे सहकारी आणि खासगी कारखान्यांवर प्रचंड आर्थिक ताण येणार आहे. जे आता स्थिर खर्च संरचना, वाढत्या कर्जाचा बोजा आणि शेतकर्यांना वेळेवर उसाचे पैसे देण्याबाबत अडचणींना तोंड देत आहेत.
ऊस खरेदीची किमान आधारभूत किंमत विरूद्ध साखरेचा किमान विक्रीदर यात तफावत वाढत आहे. साखर कारखान्यांना शेेतकर्यांना देणे बंधनकारक असलेली उसाची किमान किंमत आणि त्यांना साखर विकण्याची परवानगी असलेली किंमत किमान दर यातील दरी वाढत आहे. साखरेचा उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ४१६६ इतका अंदाजित आहेे, जो सध्याच्या ३१०० च्या किमान साखर विक्री दरापेक्षा खूपच जास्त आहे. एफआरपी आता प्रतिक्विंटल ३५५ पर्यंत वाढवल्याने उत्पादनखर्च आणखी वाढेल, जो प्रतिक्विंटल ४३०० रूपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे.
अनेकदा उसाच्या रास्त किमत वाढूनही साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलच्या हिकमतीमध्ये प्रमाणबद्ध वाढ न होणे हे टिकाऊ नाही. तातडीने सुधारणात्मक उपाययोजना केल्या नाहीत, तर आगामी हंगामात अनेक साखर कारखान्यांचे कामकाज ठप्प होईल. (सकाळ, ११.०५.२०२५)