anekant.news@gmail.com

9960806673

राज्य शासनाचे विभागनिहाय साखर उतारा आधारभूत ऊस दर धोरण जाहीर

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे गाळप हंगाम 2024-2025 साठी ऊस दर अदा करावयाचे विभागनिहाय धोरण राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने जाहीर केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने याबाबत दि.27 नोव्हेबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्र शासनाने दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेद्वारे, गाळप हंगाम 2024-2025 साठीचा किमान एफआरपी ऊस दर प्रसिध्द केलेला आहे. सदर अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊसदर विचारात घेता, गाळप हंगाम 2023-2024 साठी जाहीर केलेल्या एफआरपी ऊस दरात बदल झालेला आहे.

सदर बदल आणि त्यासंदर्भातील दि.26 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश विचारात घेता, 2024-2025 हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफआरपी ऊसदर निश्चित करताना आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा निश्चित करणे आवश्यक असल्याने शासनाने त्याबाबत निर्णय घेऊन गाळप हंगाम 2024-2025 व त्यापुढील हंगामांचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफ.आर.पी. ऊस दर अदा करताना आधारभूत धरावयाचा साखर उतारा पुणे व नाशिक विभागासाठी 10.25 टक्के तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागासाठी 9.50 टक्के असेल.

याप्रमाणे आधारभूत साखर उतारा विचारात घेऊन त्या त्या महसूल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने सन 2024-2025 च्या हंगामासाठी एफ.आर.पी. च्या धोरणात दि.27 फेब्रुवारी 2024 च्या अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या मुलभूत एफ.आर.पी.दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफ.आर. पी. ऊस दर खालीलप्रमाणे निश्चित करून ऊस (नियंत्रण) आदेश 1966 मधील कलम 3 नुसार अदा करण्याची कार्यवाही करावी. हंगाम 2024-2025 करीता बेसिक 10.25 टक्के साखर उतार्‍यासाठी रास्त व किफायतशीर ऊसदर प्रति क्विंटल 340 रुपये.

तर साखर उतारा 10.25 टक्केच्या वरील प्रत्येक 0.1 टक्के उतारा वाढीसाठी प्रिमियम प्रति क्विंटल दर 3.32 रुपये, साखर उतारा 10.25 टक्के पेक्षा कमी परंतू 9.50 टक्के पेक्षा जास्त असलेल्या प्रकरणी प्रत्येक 0.1 टक्का उतारा घटीसाठी प्रति क्विंटल दर 3.32 रुपये तथापि, साखर उतारा 9.50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास रास्त व किफायतशीर ऊसदर प्रति क्विंटल 315.10 रुपये आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा यासह इतर सर्व धोरणात्मक बाबी या दि. 21 फेब्रुवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील. हा आदेश गाळप हंगाम 2024-2025 पासून लागू होईल.