मंत्री उपसमितीची महिनाअखेरीस बैठक ः शेतकर्यांना दिलासा
सातारा ः राज्यातील गळीत हंगामाला यंदाचा दिवाळीचाच मुहूर्त लागणार असलयाचे जवळपास निश्चित झाले आहे. गतवर्षी विधानसभा निवडणुकांमुळे हंगाम १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता. यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही नुकसान झाले होते. यंदा दिवाळीच्याच तोंडावर जरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्या तरी त्याचा फारसा परिणाम हंगामावर होणार नसल्याची चिन्हे आहेत.
१५ दिवस अगोदरच हंगाम सुरू होणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. हंगाम निश्चितीसाठी दि. २५ सप्टेंबर रोजी मंत्री उपसमितीची बैठक होणार आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यातच शेतकर्यांना यंदाचा गळीत हंगाम लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हंगामासाठी ३५५० दर निश्चित - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनेे २०२५-२६ च्या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी १०.२५ टक्के उतार्यासाठी ३५५० रूपयांचा दर निश्चित केला आहे. तर त्यापुढील १ टक्क्यासाठी प्रत्येक टनाला ३४६ रूपये मिळणार आहेत. याउलट उतार्याचे प्रमाण कमी झाल्यास प्रतिटन ३४६ रूपये कमी होणार आहेत. मात्र ९.५ टक्के पेक्षा कमी जरी उतारा असला, तरी प्रतिटनाचा किमान दर हा ३४६१ रूपयेच असणार आहे. यामुळे ९.५ टक्के साखर उतार्यासाठी कारखानदारांना शेतकर्यांना कि मान ३४६१ रूपये द्यावे लागणार आहेत. (पुढारी, ०१.०९.२०२५)