शेतकर्यांनाही फायदा ः हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन
पणजी ः भारताने इथेनॉल पुरवठा वर्ष २०२५ मध्ये जवळपास २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केेले. इथेनॉलमुळे भारताने १९.३ अब्ज डॉलर्सची परकीय चलनाची बचत केली आहे. तर यातून शेतकर्यांना मागील दशकभरात १५ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत, असे केंद्रिय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी सांगितले.
पुरी म्हणाले, की जैवऊर्जेच्या क्षेत्रातील व्यापक प्रयत्नाचा भाग म्हणून भारत आपले कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे. जागतिक वीज निर्मितीत नवीकरणीय ऊर्जेचा वाटा एक पंचमांशवरून जवळपास एक तृतीयांश इतका वाढला आहे. तरीही वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी पारंपरिक ऊर्जेची गरज अजूनही कायम आहे.
देशाच्या भविष्यातील ऊर्जेच्या मागणीवर बोलताना पुरी म्हणाले, २०५० पर्यंत जगातील एकूण ऊर्जा मागणीत भारताचा वाटा जवळपास ३०-३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे जगाच्या एकूण ऊर्जा मागणीत भारताचा वाटा सुमारे १० टक्के असेल.
सध्या पेट्रोलियम क्षेत्राचा भारताच्या एकूण व्यापारात सुमारे २८ टक्के वाटा आहे. जहाजबांधणीसाठी सरकारने दिलेल्या ८ अग्ज डॉलर पॅकेजच्या पार्श्वभूमीवर, तेल आणि गॅस व्यापारासाठी गरजेच्या असलेल्या ६० जहाजासाठी ५ अब्ज डॉलरची गुंतवणूकीची संधी नजीकच्या काळात असल्याचे पुरी यांनी सांगितले.
देशात इंधन दर कमी - २०२१ नंतर जगातील अनेक प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये इंधनाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. पण २०२५ मध्ये भारतातील इंधन दर मात्र कमी पातळीवर राहिला. तसेच सुमारे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या १० कोटी लाभार्थ्यांसाठी एलपीजी सिलिंडरचा दर सुमारे प्रति सिलिंडर ५.५ ते ६ अमेरिकी डॉलर इतका स्थिर राहिला. हा दर जगातील सर्वात कमी दर आहे, असा दावा पुरी यांनी केला. (अॅग्रोवन, २८.०१.२०२६)