anekant.news@gmail.com

9960806673

ऊसतोड कामगारांचे 200 कोटी रूपये थकले

महामंडळाचे कामकाज ठप्प, राज्य कामगार संघटनेचा आरोप
नाशिक ः राज्यात ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाचे कामकाज दोन वर्षांपासून ठप्प आहे. ओळखपत्र देऊ असे जाहीर करूनही अद्याप ते देण्यात आले नाही. गेल्या 3 वर्षात 35 कोटी टन उसाचे गाळप झाले. प्रतिटन 10 रूपये याप्रमाणे 350 कोटी रूपये महामंडळाकडे जमा होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात 150 कोटी रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित राहात असून, तब्बल 200 कोटी रूपये थकले असल्याचा आरोप कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सिटू संलग्‍न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानसार 3 एप्रिल 2022 रोजी सरकारने महामंडळाच्या राज्य कार्यालयाचे पुणे येथे उद्घाटन केले. मात्र गेली दोन वर्षे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे कामकाज ठप्प आहे.
राज्यात 2021-22, 2022-23 व 2023-24 या हंगामात एकूण 35 कोटी टन उसाचे गाळप झाले. प्रतिटन 10 रूपये प्रमाणे साखर कारखाने व राज्य सरकार यांनी प्रत्येकी 350 कोटी रूपये कल्याणकारी महामंडळाकडे जमा करायला पाहिजे होते. त्यापैकी साखर कारखान्याने व सरकारने मिळून 150 कोटी रूपये जमा केले आहेत. महामंडळाच्या वतीने 2023-24 च्या हंगामात या कामगारांना प्रत्येकी 5 लाख रूपयांचा अपघात विमा संरक्षण देण्यात आले आहे. परंतु अन्य सुविधा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अशा आहेत कामगारांच्या मागण्या
* जिल्ह्यातील सर्व ऊसतोडणी व वाहतूकदार यांची महामंडळात नोंदणी करून ओळखपत्र देण्यात यावे.
* नोंदणीत कामगारांना 10 लाख रूपयांचा अपघात विमा संरक्षण व औषध उपचाराची सुविधा देण्यात यावी.
* कामगारांना बोनस, ग्रॅच्युईटी, पगारी रजा, पेन्शन, मुला मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती आदी लाभ सुरू करा.
* जाहीर करण्यात आलेली 82 वसतिगृह सुरू करा.
* विभागीय पातळीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करा.
* नोंदीत ऊसतोडणी कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचे संच देण्यात यावे. (पुण्यनगरी, 15.12.2024)