देशात गळीत हंगाम हळूहळू वेग घेत आहे. १५ डिसेंबरअखेर देशात ६१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन १३ लाख टनांनी कमीच आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत ७४ लाख टन उत्पादन झाले होते.या कालावधीत उत्तर प्रदेशने २३ लाख टनांसह साखर उत्पादनात अग्रस्थान कायम राखले आहे. १७ लाख टनांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर तर १४ लाख टनांसह कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेश वगळता महाराष्ट्र व कर्नाटक ही राज्ये पिछाडीवर आहेत.
गेल्या हंगामात या कालावधीअखेर उत्तर प्रदेशमध्येही २३ लाख टन साखर तयार झाली होती. महाराष्ट्रात २५ लाख तर कर्नाटकात १८ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात ७ लाख टन तर कर्नाटकात ५ लाख टन साखर कमी उत्पादित झाली.
साखरेच्या उताऱ्यात मात्र यंदा तिन्ही राज्ये पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशचा साखर उतारा ८.९० टक्के, महाराष्ट्राचा ८.१० टक्के तर कर्नाटकचा ८.३० टक्के आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यंदा साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ९८ लाख टन, महाराष्ट्रात ८७ लाख टन तर कर्नाटकात ४५ लाख टन साखर तयार होईल, असा अंदाज संघाच्या सूत्रांचा आहे.
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये १०३ लाख टन, महाराष्ट्रात ११० लाख टन तर कर्नाटकमध्ये ५३ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षीचे अग्रस्थान यंदा महाराष्ट्राला टिकवता येणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी ३१९ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा यात घसरण होऊन साखरेचे उत्पादन २८० लाख टनांपर्यंत स्थिरावेल, असा अंदाज संघाचा आहे.
साखर घसरणीत महाराष्ट्राचा वाटादेशाचा हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू झाला. महाराष्ट्र व कर्नाटक या महत्त्वाच्या राज्यांचा हंगाम नोव्हेंबरच्या शेवटीशेवटी सुरू झाला. १५ डिसेंबरअखेर देशात ४७२ साखर कारखाने सुरू झाले आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत ५०१ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. गेल्या वर्षीप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये यंदाही १२० साखर कारखाने सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात मात्र १५ डिसेंबरअखेर १८ कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. सध्या १८३ कारखाने महाराष्ट्रात सुरू आहेत. कर्नाटकातही तीन कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. महाराष्ट्राचे साखर उत्पादन घटल्याने याचा परिणाम देशाच्या एकूण साखर उत्पादनावरही होताना दिसत आहे.
ऊस तोडणीतही उत्तर प्रदेश आघाडीवरयंदा या कालावधीत ७२० लाख टन उसाची तोड देशात झाली. गेल्या वर्षी ८५० लाख टन उसाची तोड झाली होती. ऊस तोडणीमध्येही उत्तर प्रदेश आघाडीवर असून २५७ लाख टन उसाची उत्तर प्रदेशात तोडणी झाली. महाराष्ट्रात २०७ तर कर्नाटकात १६३ लाख टन उसाची तोड झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत उत्तर प्रदेशात २४३ महाराष्ट्रात २९६ तर कर्नाटकात २०६ लाख टन उसाची तोड झाली होती.