लातूर ः गेल्या १५ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातून पुन्हा एकदा गोड साखर बाहेर पडू लागली असून, या साखरेसोबतच शेतकर्यांच्या जीवनातही गोडवा निर्माण झाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सहकारावर ठेवलेल्या ठाम विश्वासामुळे बंद, विक्रीस काढलेला आणि पुन्हा सुरू होणार नाही, असा शिक्का बसलेला हा कारखाना आज पुन्हा कार्यरत झाला आहे. कारखाना सुरू झाल्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक उद्योगांना चालना मिळाली आहे तसेच रोजगारनिर्मितीला नवी दिशा प्राप्त झाली आहे.
किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी सााखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेले आर्थिक व प्रशासकीय प्रयत्न निर्णायक ठरले आहेत. अनेक वर्षे बंद असलेला हा कारखाना पुन्हा सुरू करणे हे मोठे आव्हान होते. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या भक्कम सहकार्यामुळे हे शक्य झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यानी दिलेल्या सकारात्मक पाठबळामुळे कारखान्याच्या पुनरूज्जीवनासाठी आवश्यक निधी आणि मान्यता मिळाल. या समन्वयातून किल्लारी कारखान्याला नवे जीवन मिळाले असून शेतकरी, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे.
किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ५० हजार मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण करणे हा माझ्यासाठी आणि समस्त शेतकरी बांधवांसाठी अभिमानाचा क्षण आहे. १५ वर्षे बंद असलेला कारखाना सहकाराच्या माध्यमातून पुन्हा सुरू करणे हे मोठे आव्हान होते. मात्र शेतकर्यांच्या विश्वासामुळे आणि निळकंठेश्वराच्या कृपाशीर्वादामुळे हे शक्य झाले आहे. हा कारखाना शेतकर्यांच्या आर्थिक स्थैर्याचा आधार बनेल. रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि पारदर्शक कारभारातून किल्लारी कारखान्याचा संपूर्ण कायापालट करण्याचा माझा निर्धार आहे.शेतकर्यांच्या हितासाठी ही वाटचाल अखंड सुरू राहील. - आमदार अभिमन्यू पवार (पुढारी, १६.१२.२०२५)