भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शेतकर्यांकडून अपेक्षा
जळगाव ः धुळे, जळगाव जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांची दैना झाली आहे. त्यातील मोठ्या यंत्रणेची चोरी झाली असून, त्यात अतिक्रमणदेखील झाले आहे. कर्जबाजारीपणा व अन्य कारणांनी हे कारखाने बंद अवस्थेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील वसंत सहकारी साखर कारखाना, जामनेरमधील गोंडखेल साखर कारखाना, धुळ्यातील शिरपूर शेतकरी साखर कारखाना व साक्री येथील पांझरा कान साखर कारखान्यांची दैना झाली आहे. हे कारखाने दुरूस्त करून भाडेतत्वावर देण्याची गरज शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यात एकही सहकारी कारखाना सुरू नाही. काही वर्षांपूवी शिरपूर कारखाना सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली. परंतु तिला प्रतिसाद मिळाला नाही. हे साखर कारखाने सुरू झाल्यास रोजगार उपलब्ध, कष्टकर्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. खानदेशात कापूस, केळी, भाजीपाला पिकांकडील शेतकर्यांचा ओढा कमी होत आहे. कारण उसाला सरकारी हमी असल्यामुळे शेतकर्यांची त्याला पसंती आहे. कारखानदारी सुरळीत झाल्यास ऊस पीक वाढेल. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीतून बाहेर येतील, असा मुद्दा जिल्ह्यातील शेतकर्यांकडून उपस्थित केला जात आहे. (अॅग्रोवन, २५.०१.२०२६)