anekant.news@gmail.com

9960806673

दीड महिन्यात थंडावणार बॉयलर

उसाची कमतरता ः ९२ लाख टन उसाचे गाळप
अहिल्यानगर ः जिल्ह्यात मागील वर्षीपेक्षा घटलेले उसचे क्षेत्र, साखर कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता आदी कारणांमुळे यंदाचा ऊस गळीत हंगाम लवकर आटोपण्याची शक्यता आहे. आगामी दीड महिन्यातच कारखान्यांचे बॉयलर थंडावू शकतात. आजअखेर ९२ लाख १५ हजार ५४९ मे.टन उसाचे गाळप करून ७८ लाख ७८ हजार ५७२ क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
राज्यात अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर हे जिल्हे साखर कारखानदारीत आघाडीवर आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याने सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवली. मात्र जिल्ह्यातही खासगी कारखानदारी फोफावली आहे. जिल्ह्यात यंदा अवघे दीड लाख हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. मागील हंगामात १ लाख ६० हजार हेक्टरवर उसाचे मळे होते. यंदा १० हजार हेक्टरने क्षेत्र घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ दिवस अगोदरच हंगाम सुरू झाला. परवानगी अभावी, तसेच अन्य कारखान्यांमुळे मागील हंगाम सुरू होण्यास उशीर झाला होता. त्यामुळे तो एप्रिलएखेरपर्यंत चालला.
यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात एकूण २२ साखर कारखाने सुरू आहेत. ते आणखी एक ते दीड महिने चालू शकतील एवढाच ऊस जिल्ह्यात आहे. शेजारील पुणे,. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने नगरचा ऊस गळितास नेत आहेत. परिणामी उसाची टंचाई जाणवत आहे. अतिवृष्टीमुळे सखल भागातील ऊस बाहेर काढण्यास अडचण येत आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार शेतकर्‍यांची अडवणूक करीत असल्याचेही चित्र आहे. (सकाळ, २८.०१.२०२६)