उत्तर प्रदेश दुसर्या स्थानी, डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील स्थिती
कोल्हापूर ः देशातील गळीत हंगामाने डिसेंबर मध्यापर्यंत वेग घेतला आहे. ऊस उत्पादक प्रदेशातील बहुतांशी राज्यात अनुकुल हवामानामुळे तोडणी गतीने होत असल्याचे चित्र आहे. तर साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ताज्या अहवालानुसार १५ डिसेंबरअखेर महाराष्ट्रात ३१.३० लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे.
महाराष्ट्रात यंदा १९० साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत. आतापर्यंत ३७९.३९ लाख टन उसाचे गाळप झाले असून, साखर उतारा ८.२५ टक्के नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत साखर उत्पादन केवळ १६.८० लाख टन होते. म्हणजेच यंदा उत्पादनात तब्बल १४.५० लाख टनांची वाढ झाली आहे. देशातील एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.
उत्तर प्रदेशात १२० कारखाने सुरू असून २६३.६८ लाख टन उसाचे गाळप झाले असून २५.०५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यात साखर उतारा तुलनेने कमी (९.५० टक्के) असला तरी उत्पादनात उत्तर प्रदेश दुसर्या क्रमांकावर आहे. कर्नाटकात ७६ कारखान्यांमधुन १५.५० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गुजरातमध्ये १४ कारखान्यांद्वारे १.८५ लाख टन तर तमिळनाडूत ०.५५ लाख टन साखर उत्पादनाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांचा मिळून देशातील एकूण साखर उत्पादनात ९२ टक्क्यांहून अधिक वाटा आहे. त्यामुळे आगामी काळात साखर उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे.
देशात यंदा ४७९ कारखान्यांमार्फत आतापर्यंत ९०१.२७ लाख टन ऊस गाळप होऊन ७७.९० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन १७.२० लाख टनांनी अधिक आहे.. सरासरी साखर उतारा ८.६४ टक्केे इतका असून, गेल्या हंगामापेक्षा तो किंंचित जास्त आहे. (अॅग्रोवन, १७.१२.२०२५)