इथेनॉल वर्ष २०२४-२५ करिता तेल कंपन्यांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांमध्ये सहकारी साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉल पुरवठ्याकरिता प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खासगी कारखान्यांमधून उत्पादित होणारे इथेनॉल तिसऱ्या क्रमांकाच्या प्राधान्यक्रमाने खरेदी करण्यात येईल,असे निविदांमध्ये नमूद करण्यात आले आहे, ही बाब खासगी साखर उद्योगासाठी संकटाची चाहूल आहे. अशाप्रकारच्या जाचक अटी व शर्तींमधून सवलत देऊन खासगी साखर उद्योगास त्यामधून वगळावे, अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केंद्र सरकारकडे केली आहे.
साखर उद्योगासमोरील विविध समस्यांबाबत ‘विस्मा’ने केंद्राला पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. या वर्षीच्या गाळप हंगामाकरिता उसाच्या एफआरपीत वाढ झाल्याने साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल उत्पादनाच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे साखरेच्या किमतीसह उसाचा रस, बी हेवी, सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदी किमतीत शासनाने सुधारित दर किमान तीन ते पाच रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ करण्याची आग्रही मागणी केली आहे.
एप्रिल ते जूनमधील अवर्षण व त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत अतिपर्जन्यवृष्टीमुळे उसाची लवकर पक्वता, उसाला तुरा येणे, उसाची वाढ कमी होणे या कारणांमुळे आतापर्यंत झालेल्या गाळपात हेक्टरी उसाच्या उत्पादनात घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे राज्यातील सरासरी साखरेचा उतारादेखील गतवर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात राज्यात १०० ते १०२ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचे अनुमान आहे. त्यापैकी १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात एकूण निव्वळ ९० लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे, असंही त्यात म्हटलं आहे.
राज्यातील स्थानिक बाजारपेठेत साखरेचे दर ३३०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली घसरले आहेत. सरासरी ३५०० ते ३६०० रुपये दरापेक्षा ते मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कारखान्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये साखर विक्री करावी लागत आहे. केंद्र सरकारने साखर उद्योगाच्या हितास्तव तातडीने साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ४१ ते ४२ रुपये करणे आवश्यक आहे.बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा