anekant.news@gmail.com

9960806673

इथेनॉल पुरवठ्यात उत्तर प्रदेश आघाडीवर

सर्वाधिक प्रकल्प असूनही महाराष्ट्राची घसरण, सहा महिन्यांतील स्थिती
कोल्हापूर ः इथेनॉल वर्षाच्या (२०२४-२५) सुरूवातीच्या सहामहीत उत्तर प्रदेशने तेल कंपन्यांना सर्वाधिक इथेनॉल पुरवठा करून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. जूनअखेर उत्तर प्रदेशने ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्राचा क्रमांक या यादीत दुसर्‍या स्थानी आहे. महाराष्ट्राने ६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे इथेनॉल निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र आघाडीवर असूनही, प्रत्यक्ष पुरवठ्याच्या बाबतीत तो उत्तर प्रदेशच्या मागे पडला आहे.
तमिळनाडू ६० कोटी लिटरचा पुरवठा करत तिसर्‍या स्थानावर आहे. कर्नाटकने ४७ कोटी लिटरचा पुरवठा केला आहे. यंदा कमी क्षमतेने ऊस हंगाम चालल्याने याचा फटका महाराष्ट्रातील उसावर आधारित इथेनॉल प्रकल्पांना बसला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण विभागाकडील माहितीनुसार सध्या देशाची वार्षिक इथेनॉल निर्मिती क्षमता १८२२ कोटी लिटर इतकी आहे. या क्षमतेेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे.
महाराष्ट्राची इथेनॉल उत्पादन क्षमता ३९६ कोटी लिटर आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश ३३१ कोटी लिटर क्षमतेसह दुसर्‍या क्रमांकावर तर कर्नाटक २७० कोटी लिटर क्षमतेसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये असलेली उत्पादन क्षमता आणि प्रत्यक्षात झालेला पुरवठा यात कमी तफावत आहे. याउलट महाराष्ट्राची क्षमता सर्वाधिक असूनही, प्रत्यक्षात मात्र क्षमतेच्यचा तुलनेत इथेनॉल निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे इथेनॉल पुरवठा घटल्याचे दिसून येत आहे.
जून अखेरच्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण ४९९ प्रकल्पांनी तेल कंपन्यांना ५८७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. महाराष्ट्रात १६८ प्रकल्प आहेत. तर उत्तर प्रदेशात ही संख्या केवळ ७८ आहे. कर्नाटकात ४६ तर तमिळनाडूत केवळ १५ प्रकल्प आहेत. उत्तर प्रदेश, तमिळनाडूमध्ये ऊस, साखरेबरोबर धान्य आधारित प्रकल्प अधिक असल्याने या राज्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती चांगली आहे.
महाराष्ट्राला फटका - साखर तज्ज्ञांच्या मते २०२४-२५ हंगामात गाळपासाठी ८५३ लाख टन ऊस उपलब्ध होता, तर मागील हंगामात तो १०७६ लाख टन होता. या सुमारे १६ टक्केच्या घटीने इथेनॉल आणि साखर दोन्हीच्या उत्पादनावर थेट परिणाम केला आहे. एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत अवर्षण, त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत अति पर्जन्यवृष्टीमुळे उसाची लवकर पक्वता झाली. उसाला तुरा आला आणि वाढ कमी झाल्याने हेक्टरी उत्पादन घटले. अनियमित आणि अपुर्‍या पावसामुळे उसाची गुणवत्ता आणि वाढीवर नकारात्मक परिणाम झाला. हवामान बदलाचा इथेनॉल पुरवठा साखळीवर थेट परिणाम झाला. अनियमित पाऊस, अवर्षण आणि अतिवृष्टीमुळे उसाचे हेक्टरी उत्पादन कमी झाले, साची लवकर पक्वता झाली आणि साखर उतारा घटला. यामुळे साखर आणि इथेनॉल दोन्हीसाठी कच्च्या मालाची उपलब्धता कमी झाली.
गेल्या वर्षी हंगाम पुरेसा चालला नाही. याचा फटका साखरेबरोबरच इथेनॉल निर्मितीला बसला आहे. यामुळे राज्यातील प्रकल्पांमधून अपेक्षित इथेनॉल निर्मिती झाली नाही. उसावर आधारित प्रकल्पांबाबत बोलायचे झाल्यास बी हेवी मोलॅसिस कमी प्रमाणात शिल्लक असल्याने पुढील हंगामापर्यंत तरी पुरेशा प्रमाणात इथेनॉल निर्मिती होईल की नाही या बाबत साशंकता आहे. - विजय औताडे, साखर तज्ञ (अ‍ॅग्रोवन, १२.०८.२०२५)